दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी ५० हजारांची लाच; लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा एपीआय एसीबीच्या जाळ्यात…

लोणी काळभोर ता. हवेली : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला (एपीआय) ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. कृष्णा जनार्दन बाबर (वय ४५, पदस्थापना – लोणी काळभोर पोलीस ठाणे) असे कारवाई झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ५७ वर्षीय पुरुष तक्रारदाराने ८ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम ३१८(३), ३१८(५) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
गुन्ह्याचा तपास आरोपी अधिकाऱ्याकडे
सदर गुन्ह्याचा तपास लोकसेवक एपीआय कृष्णा बाबर यांच्याकडे होता. तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी आरोपी अधिकाऱ्याने केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
याशिवाय, तक्रारदाराचा मुलगा नाव बदलून (चंदू) याच्या उच्च न्यायालयात सुरू असलेल्या अटकपूर्व जामीन अर्जामध्ये मदत करण्यासाठी आरोपीने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीची पडताळणी अन् एसीबीचा सापळा
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लाचेच्या मागणीबाबत निष्पन्न झाल्यानंतर ८ सप्टेंबर रोजी सापळा कारवाईचे नियोजन करण्यात आले.
त्यानुसार मांजरी परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी लोकसेवक एपीआय कृष्णा बाबर यांनी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले.
स्विफ्ट कारमध्ये स्वीकारली लाच
एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मांजरी येथील पंचाक्ष १५ चौक, शितळादेवी मंदिरासमोर, श्रीकांत ट्रेडर्स दुकानासमोर उभ्या असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक एमएच-०४-केबी-७८७९ मध्ये ५० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यात आली.
लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला रात्री ११.०२ वाजता ताब्यात घेतले.
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये हडपसर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने नमूद केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सतीश संभाजी वाळके, सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक सुधास हेटेकर तसेच पोलीस उपनिरीक्षक भूषण ठाकूर, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली माकर आणि चालक पोलीस हवालदार दीपक काकडे यांचा समावेश असलेल्या पथकाने सहभाग घेतला.
या कारवाईवर पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके हे पर्यवेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती असल्यास अथवा कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यावरच लाच स्वीकारल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एसीबीच्या तपासात लाचेची मागणी, स्वीकारलेली रक्कम आणि संबंधित गुन्ह्याच्या तपासातील इतर बाबींबाबत आणखी काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



