गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरी करणाऱ्या टोळीवर विश्रामबाग पोलिसांचा मोठा प्रहार!…
१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्ह्यांची उकल, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन, मंगळसूत्र, पर्समधील दागिने, मोबाईल व पाकीट चोरी करणाऱ्या टोळीवर विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल १५ संशयित आरोपींना ताब्यात घेऊन २२ गुन्ह्यांची उकल केली असून, सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असलेल्या राज्यातील तसेच परराज्यातील चोरीच्या टोळ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.
परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त कृषीकेश रावले यांच्या आदेशानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक उमेश कारके व त्यांच्या पथकाला गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात गस्त घालून चोरी करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार तपास पथकाने गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी साध्या वेशात निगराणी ठेवली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या १५ जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९ गुन्हे उघडकीस आले असून, त्यामध्ये १५ सोने चोरीचे, ३ मोबाईल चोरीचे आणि १ पाकीट चोरीचा गुन्हा आहे. तसेच फरासखाना पोलीस ठाण्याचे ३ सोने चोरीचे आणि चंदननगर पोलीस ठाण्याचा १ गुन्हा उघडकीस आला आहे. अशा प्रकारे विविध पोलीस ठाण्यांमधील एकूण २२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संतोष कान्हु पवार (रा. अहिल्यानगर), जालिंदर शयीराव वाघमारे (रा. गजानन नगर, बीड), सुशांत शिवाजी गायकवाड (रा. म्हाडा कॉलनी, लातूर), गफर मौला शेख वर्षे (रा. नामपल्ली, हैदराबाद) आणि शेख सैबाज शेख शफीक (रा. मालेगाव, नाशिक) यांचा समावेश असून, विविध गुन्ह्यांमध्ये त्यांना २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सलग ५६ तास तपास पथकाने अथक परिश्रम घेत ही कारवाई केली. या कारवाईमुळे गणेशोत्सवाच्या गर्दीत चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी प्रभावी कारवाई केल्याचे दिसून आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रमेश लाहिगुडे व संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशिकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, सागर मोरे, अर्जुन थोरात, नितीन बाबर आणि रोशनी बर्डे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Editer sunil thorat



