लोणावळ्यात पर्यटकांकडून खंडणी वसुली! महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल…
कारवाईची भीती दाखवत दुचाकीस्वाराकडून QR कोडद्वारे घेतले १ हजार रुपये; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर...

लोणावळा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात पर्यटकांकडून कथित खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्ग सुरक्षा पोलीस खंडाळा दलाकडे कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांनी दुचाकीस्वार पर्यटकाला कारवाईची भीती दाखवून ऑनलाइन QR कोडद्वारे १ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तिन्ही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. १ ऑक्टोबर २०२६) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार विक्रमसिंह मोतीसिंह रघुवंशी (वय ३३, व्यवसाय शिक्षक, रा. कल्याण, मूळ रा. भोपाळ, मध्यप्रदेश) हे आपल्या पत्नीसह रॉयल एनफिल्ड बुलेटवरून खंडाळा एक्झिट येथून जात होते. त्यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी निलेश अशोक साळुंखे, रोहिदास बदाम पाटील आणि राजेश सूर्यकांत केंद्रे यांनी त्यांना अडवले. तुम्ही चारचाकी वाहनांच्या मार्गावरून दुचाकी चालवत आहात, येथे दुचाकींना बंदी आहे, असे सांगून त्यांच्यावर कारवाईची भीती घालण्यात आली. तसेच सहा हजार रुपये दंड, वाहन जप्त करणे आणि वाहनचालक परवाना निलंबित करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तडजोड करून संबंधित कर्मचाऱ्यांनी अमोल गणपत डोके यांच्या ऑनलाइन QR कोडवर तक्रारदाराकडून एक हजार रुपये घेतल्याचे समोर आले. मात्र, या प्रकाराबाबत तक्रारदाराला संशय आल्याने त्यांनी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. त्यावेळी संबंधित व्यक्ती पोलीस नसून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तिन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. तक्रारदाराच्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०८(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे आणि लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे करीत आहेत.
दरम्यान, लोणावळा आणि खंडाळा परिसरात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला रस्त्यावर रोख रक्कम अथवा ऑनलाइन पद्धतीने दंड देऊ नये, असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ ११२ क्रमांकावर किंवा लोणावळा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच अशा प्रकारचा कथित गैरप्रकार घडल्याने खळबळ उडाली असून, पर्यटनस्थळी पर्यटकांची अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat



