भक्ती, सेवा आणि संस्कारांचा संगम; स्वराज्य प्रतिष्ठानचा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात!
आई सरस्वतीच्या चरणी शालेय साहित्य अर्पण करण्याचा स्तुत्य उपक्रम; आरोग्य शिबिर, भजनी कार्यक्रम आणि युवा जनजागृती व्याख्यानाचे आयोजन

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कवडीपाट येथील भापकर प्लॉटिंग परिसरात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने तिसऱ्या वर्षी शारदीय नवरात्रोत्सव २०२६ भक्तिभावाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात येत आहे. धार्मिक परंपरेसोबतच समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि युवा जनजागृतीला प्राधान्य देत प्रतिष्ठानने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून देवीच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी भाविक उपस्थित राहत आहेत.
या उत्सवाच्या आरती प्रसंगी हभप सुशील महाराज काळभोर, छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विशाल गुजर, अँड राहुल झेंडे, बाबासाहेब चव्हाण, राकेश लोंढे, अभिजीत गुजर, दीपक ढोरे, किरण ढोरे, वैभव गुजर आणि यांनी उपस्थिती लावली. यावेळी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला.
स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने ‘आई सरस्वतीच्या चरणी वही अर्पण करा’ ही विशेष संकल्पना राबविण्यात येत आहे. भाविकांनी देवीच्या चरणी वही अर्पण करावी आणि संकलित शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. भक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. याशिवाय आरोग्य शिबिराचे आयोजन, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे व्याख्यान आणि अष्टमीच्या निमित्ताने होमहवन असे धार्मिक व सामाजिक उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
प्रतिष्ठानच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये १५ ऑक्टोबर २०२६ रोजी भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. १७ ऑक्टोबर रोजी ‘लव्ह जिहाद आणि युवा जनजागृती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणे, युवकांना मार्गदर्शन करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे, हा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे.
स्वराज्य प्रतिष्ठानचे आधारस्तंभ नंदकुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल शिंदे, अभिषेक शेलार, मयूर भोसलेकर, अजिंक्य भोसलेकर, कुणाल चौधरी, शुभम शेटे, प्रणव कानसे, सुशांत घाडगे, दिव्याल शेंडगे, शुभम कांबळे आणि सौरभ जनराव यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
‘वर्ष तिसरे, अभिमानाचे!’ या भावनेतून स्वराज्य प्रतिष्ठानने कवडीपाट परिसरातील आई माऊलीच्या नवरात्रोत्सवाला भक्ती, सेवा आणि संस्कारांची जोड दिली आहे. धार्मिक उत्सव हा केवळ पूजाअर्चेपुरता मर्यादित न राहता समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत, नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि युवकांमध्ये जनजागृती घडविण्याचे माध्यम बनावा, हा या उपक्रमांचा मुख्य संदेश आहे.
Editer sunil thorat









