दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा; २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांचे शुल्क माफ
आधी शुल्क भरलेल्यांनाही पैसे परत मिळणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत असून, परीक्षा अर्ज भरताना शुल्क भरण्याची गरज भासू नये यासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेत आतापर्यंत तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी एकही रुपया परीक्षा शुल्क न भरता परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
दुष्काळाच्या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी आर्थिक ताण सहन करावा लागू नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने शासनाने पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, संबंधित संचालनालये, विद्यापीठे आणि परीक्षा विभाग यांच्या माध्यमातून आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही, याचाही विभागाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.
‘झिरो चलन’मुळे परीक्षा अर्ज भरताना शुल्क भरण्याची गरज नाही
परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागू नये, यासाठी ‘झिरो चलन’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेमुळे शुल्कमाफीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क न भरता आपले परीक्षा अर्ज दाखल करता येत आहेत. परिणामी, आर्थिक अडचणींमुळे परीक्षा अर्ज भरण्यात अडथळे येण्याची शक्यता कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विद्यापीठांनी परीक्षा शुल्कमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात परिपत्रकेही जारी केली आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, ही शासनाची भूमिका आहे. पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोणताही पात्र विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहू नये आणि विद्यार्थ्यांना लाभ घेताना अडचणी येऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.
आधी परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांनाही दिलासा
दरम्यान, ज्या पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या शुल्कमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच परीक्षा शुल्क भरले आहे, अशा विद्यार्थ्यांना भरलेले शुल्क परत करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ नव्याने परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर यापूर्वी शुल्क भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. शुल्क परताव्याची प्रक्रिया संबंधित नियम व विद्यापीठांच्या कार्यपद्धतीनुसार पूर्ण केली जाणार आहे.
विद्यापीठांशी संपर्क साधण्याचे आवाहन
परीक्षा शुल्कमाफीसंदर्भात अर्ज भरताना काही अडचण येत असल्यास किंवा शुल्क परताव्याबाबत माहिती हवी असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यार्थी विकास विभाग किंवा जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाकडून मिळणाऱ्या सूचनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार शुल्कमाफीचा लाभ घ्यावा.
विद्यापीठनिहाय संपर्क अधिकारी व दूरध्वनी क्रमांक
१. मुंबई विद्यापीठ, मुंबई : परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे – ९३२२०२०५८९; जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड – ९८३३९६९९७७.
२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे – ९८९०६४२४३१; विद्यार्थी विकास संचालक डॉ. सविता कुलकर्णी – ७७२००३६७७४; अजय ठुबे – ७५८८१६९१३४.
३. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंग एन. जाधव – ९५४५५९५९९९; विद्यार्थी विकास संचालक अलोक जत्राटकर – ८६९८९२८०८०.
४. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अंधारे – ९९७५०५५१५५; विद्यार्थी विकास संचालक डॉ. काळवणे – ७०२०६३४५०२.
५. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे – ९९२३४०९४९१; विद्यार्थी विकास संचालक डॉ. चिखलीकर – ८३९०६६६७७७.
६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बाबासाहेब डोळे – ८२३७००६५७२; विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभोरे – ९४२३७०५०८१.
७. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील – ९४२३१८५०७३; विद्यार्थी विकास संचालक महाले – ९८२३१९२८३१.
८. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी – ९८५००४२३५७; विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर – ८८५५०८३९६४.
९. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनुप पळसोकर – ८३७८९७४२४०; विद्यार्थी विकास संचालक डॉ. विजय तांगडे – ९५४५११२५५५.
१०. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन मंगुळे – ९५११९१०५७५; विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रिया गेडाम – ९०४९४७४११९.
११. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक संजय नेरकर – ९९२२४४४४६७; विद्यार्थी विकास संचालक डॉ. अंकुश चव्हाण – ९६८९६७२५०९.
१२. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक : परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. भटूप्रसाद पाटील – ७७९८९२५४८५; विद्यार्थी विकास संचालक महेंद्र बनसोडे – ९७६६०५९०७६.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा संदेश : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कमाफीच्या निर्णयाचा लाभ घ्यावा. परीक्षा अर्ज भरताना ‘झिरो चलन’ सुविधेचा पर्याय उपलब्ध आहे का, याची संबंधित विद्यापीठाच्या सूचनांनुसार खात्री करावी. यापूर्वी शुल्क भरले असल्यास परताव्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होत असून, शिक्षणातील आर्थिक अडथळे कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
Editer sunil thorat



