‘नशामुक्त युवा’ अभियान, विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

कदमवाकवस्ती (ता.हवेली) : विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आणि तरुणाईला व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, लोणी काळभोर येथे शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘विकसित भारत संकल्प अभियाना’अंतर्गत ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात पुणे शहर पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, एनडीपीएस कायदा, सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्यासह पोलीस व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, तसेच व्यक्तीच्या कौटुंबिक, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनावर होणारे दुष्परिणाम यांची माहिती देण्यात आली. अंमली पदार्थांपासून दूर राहणे, चुकीच्या संगतीपासून सावध राहणे आणि व्यसनाधीनतेपासून स्वतःचे संरक्षण करणे याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
तसेच अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे आणि कायदेशीर तरतुदींबाबत एनडीपीएस कायद्याची माहिती देण्यात आली. सध्याच्या डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अनोळखी लिंक, संशयास्पद संदेश, ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडियाचा अतिवापर यांबाबतही विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत पोलीस मदतीसाठी ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर, तर सायबर आर्थिक फसवणुकीची तक्रार नोंदविण्यासाठी १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याची माहिती देण्यात आली.
यावेळी ‘लेडी सिंघम’ म्हणून परिचित असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. या काळात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. क्षणिक आनंदाच्या मोहापायी अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये, ज्यामुळे भविष्यातील प्रगती आणि करिअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे आवाहन त्यांनी केले. निरोगी जीवनशैली स्वीकारून व्यसनांपासून दूर राहणे आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजाच्या विकासात योगदान देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला विश्वराज हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात सुमारे १५० ते २०० प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर उपस्थितांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विरोधात शपथ देण्यात आली. युवकांनी व्यसनमुक्त राहून स्वतःचे आरोग्य जपावे, सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहावे आणि विकसित, सक्षम व व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
Editer sunil thorat




