
नवी दिल्ली, दि. २ जुलै : रेड बुल, स्टिंग, मॉन्स्टर यांसारखी लोकप्रिय एनर्जी ड्रिंक्स पिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणून विकल्या जाणाऱ्या सहा प्रमुख ब्रँड्सना चुकीची लेबलिंग, दिशाभूल करणारे दावे आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत.
FSSAI ने कारवाई केलेल्या ब्रँड्समध्ये रेड बुल एनर्जी ड्रिंक, पेप्सिकोचे ॲड्रेनालाइन रश एनर्जी ड्रिंक, रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे कॅम्पा एनर्जी ड्रिंक गोल्ड बूस्ट, स्टिंग एनर्जी ड्रिंक, हेल एनर्जी आणि कोका-कोलाचे मॉन्स्टर एनर्जी यांचा समावेश आहे.
FSSAI ने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती देताना सांगितले की, संबंधित कंपन्यांनी उत्पादनांच्या ब्रँडिंग आणि जाहिरातींमध्ये ‘एनर्जी ड्रिंक’ असा उल्लेख करून नियमांचे उल्लंघन केले आहे. सध्या FSSAI ने ‘एनर्जी ड्रिंक’ या नावाने कोणतीही स्वतंत्र अन्न श्रेणी किंवा मानक निश्चित केलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारे उत्पादनांची विक्री करणे आणि त्याचे लेबलिंग करणे नियमबाह्य असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
FSSAI च्या म्हणण्यानुसार, त्यांच्या अन्नपदार्थ वर्गीकरण प्रणालीचा उद्देश केवळ उत्पादनांचे वर्गीकरण करणे हा आहे. त्या आधारे उत्पादनाचे नाव, ब्रँडिंग किंवा लेबलिंग करता येत नाही. त्यामुळे ‘एनर्जी ड्रिंक’ हा शब्द वापरून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, “शरीर आणि मनाला ऊर्जा देते”, “एकाग्रता वाढवते”, “ऊर्जेची पातळी वाढवते”, “सर्वसाधारण अशक्तपणात मदत करते” अशा प्रकारचे दावेही FSSAI ने आक्षेपार्ह ठरवले आहेत. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ तसेच संबंधित नियमांनुसार अशा प्रकारचे आरोग्यविषयक दावे करण्यास परवानगी नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांपासून FSSAI ने चुकीची ब्रँडिंग, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई अधिक कडक केली आहे. ग्राहकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचीही गंभीर दखल घेतली जात असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा कारवायांची माहिती देऊन ग्राहकांमध्ये अन्न सुरक्षेबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, FSSAI च्या या कारवाईमुळे एनर्जी ड्रिंक उत्पादक कंपन्यांसमोर नियमांचे पालन करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, ग्राहकांनीही कोणतेही पेय खरेदी करण्यापूर्वी त्यावरील लेबल आणि दाव्यांची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Editer sunil thorat



