सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; लोणी काळभोरला पुन्हा स्वतंत्र वाहतूक विभाग…
मागील वर्षापासून बंद असलेला विभाग पुन्हा सुरू; वाहतूक कोंडीवर नियंत्रणाची नागरिकांना अपेक्षा...

कदमवाकवस्ती, (ता. हवेली) दि. २० : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने वाहतूक शाखेची पुनर्रचना करत लोणी काळभोर येथे पुन्हा स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मागील वर्षापासून हा विभाग बंद करून त्याचा समावेश हडपसर वाहतूक विभागात करण्यात आला होता. मात्र, वाढती वाहतूक कोंडी, वाहनसंख्या आणि नागरिकांची सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेऊन हा विभाग पुन्हा स्वतंत्र करण्यात आला आहे. या नव्या विभागाच्या प्रभारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. जोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोणी काळभोर परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असून, पुणे–सोलापूर महामार्ग, औद्योगिक वसाहती, मोठे गृहनिर्माण प्रकल्प आणि वाढती वाहनसंख्या यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे स्वतंत्र वाहतूक विभागाची आवश्यकता वारंवार व्यक्त केली जात होती.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या पुनर्रचनेमुळे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर फाटा, कुंजीरवाडी तसेच पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करणे, नियमांची प्रभावी अंमलबजावणी, अपघातांना आळा घालणे आणि नागरिकांना तातडीची सेवा देणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
नवीन पदस्थापना आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी निर्णयाचे केले स्वागत…
मागील वर्षापासून बंद असलेला लोणी काळभोर वाहतूक विभाग पुन्हा स्वतंत्रपणे सुरू करण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, यामुळे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, अशी भावना अँड. राहुल झेंडे, अँड. बाळासाहेब दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, नितीन टिळेकर, शाहिर महेश खुळपे, राकेश लोंढे, कुमार जोगदंड आणि सचिन दाभाडे यांनी व्यक्त केली. तसेच या विभागाकडून वाहतूक नियोजन अधिक प्रभावी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat



