आषाढी एकादशीसाठी रेल्वेकडून दोन विशेष गाड्या…

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून पंढरपूर आणि दादर दरम्यान दोन आषाढी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
या गाड्या २२ ते २९ जुलै या कालावधीत धावणार असून, दादर येथून शुक्रवारी (२४ जुलै) दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी विशेष गाडी (गाडी क्रमांक ०१०४५) सोडण्यात येणार आहे.
ही गाडी त्याच दिवशी रात्री नऊ वाजून १५ मिनिटांनी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तर, पंढरपूर येथून रविवारी (२६ जुलै) मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी विशेष गाडी (गाडी क्रमांक ०१०४६) सुटणार असून, त्याच दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी दादर येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.
या गाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी हे थांबे आहेत. तर दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणी डबे, अशी या गाड्यांची रचना आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीला येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, https://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा एनटीइएस ॲपवर संपर्क करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
आरक्षण कसे करायचे ?
गाडी क्रमांक ०१०४५ आणि गाडी क्रमांक ०१०१४६ या आषाढी विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर करता येणार असून, https://www.irctc.co.in या संकेतस्थळावरही आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याशिवाय रेलवन ॲपच्या माध्यमातूनही प्रवाशांना तिकीट आरक्षित करता येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
Editer sunil thorat



