पुणे–सोलापूर महामार्गावर थारचा कहर! दुचाकीचा चुराडा ; धाराशिवच्या दोघांचा जागीच मृत्यू…

यवत : पुणे–सोलापूर महामार्गावरील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जाऊजेबाची वाडी येथील प्रिन्स हॉटेल परिसरात बुधवारी (दि. २९ जुलै) रात्री थार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात धाराशिव जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी कोचाळे (वय ४३) व अशोक नाईकनवरे (वय ४२, दोघेही रा. भूम, जि. धाराशिव) हे होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच २५ बीएच २५६६) वरून पुण्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या थार वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. प्रिन्स हॉटेलचे मालक शिवाजी ननवरे यांच्यासह रणजीत मोर्डे, रोहित मोर्डे, आप्पा पांगारकर, सिद्धार्थ ननवरे तसेच कस्तुरी व वेदांत रुग्णवाहिकेचे चालक संतोष झोंबाडे, माऊली लाड, अमोल झोंबाडे आणि स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त थार वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस क्रमांक प्लेट नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात विविध शक्यता तपासल्या जात असून यवत पोलीस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.
या भीषण अपघातामुळे पुणे–सोलापूर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी भरधाव वाहनांवर नियंत्रण आणण्याची आणि महामार्गावरील वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
Editer sunil thorat



