‘अंमली पदार्थांना नो म्हणण्याचे धाडस’! पुणे ग्रामीण पोलिसांचा व्यसनमुक्तीसाठी पुढाकार
व्यसनाधीनांना समुपदेशनासह पुनर्वसनाचा मार्ग; अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पर्यायी रोजगार देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

पुणे : अंमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगारेट, मद्य तसेच विविध व्यसनांच्या विळख्यात अडकणाऱ्या युवकांना व्यसनमुक्तीच्या प्रवाहात आणण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १० ऑगस्ट रोजी ‘अंमली पदार्थांना नो म्हणण्याचे धाडस’ या शीर्षकाखाली व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.
व्यसनाधीनतेचा व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होत असतो. त्यामुळे केवळ कारवाई करण्यापेक्षा व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देणे आवश्यक असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. यावेळी व्यसनाधीन व्यक्ती, अंमली पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आले.
अवैध व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी पर्यायी रोजगाराचा मार्ग
अंमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगारेट आणि मद्याची अवैध विक्री करणाऱ्या काही व्यक्तींवर वारंवार गुन्हे दाखल होऊनही त्या पुन्हा अवैध व्यवसायाकडे वळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना या व्यवसायातून बाहेर काढून त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित आणि चांगले जीवन जगता यावे, यासाठी पर्यायी रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यासाठी स्वयंसेवी संस्था आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून मार्गदर्शनाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
१५ ऑगस्टपर्यंत शाळा-कॉलेजांमध्ये जनजागृती
कोल्हापूर परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ, सायबर क्राईम, वाहतूक नियम आणि महिला सुरक्षेबाबत १५ ऑगस्टपर्यंत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात लाइव्ह कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, यासाठी विशेष प्रबोधन करण्यात येणार आहे.
महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षेवरही भर
व्यसनमुक्तीबरोबरच महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षेबाबतही विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पालक, शिक्षक, सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिसरात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले.
‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार’
व्यसनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होण्यासोबतच कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान, सामाजिक समस्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तींना केवळ दोष न देता त्यांना समुपदेशन, मार्गदर्शन आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून व्यसनमुक्त जीवनाकडे वळविणे गरजेचे आहे, यावर अभियानात भर देण्यात आला.
‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार’ या संदेशातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प करण्यात आला असून, ‘व्यसनमुक्त कुटुंब, सुरक्षित समाज’ हे उद्दिष्ट समोर ठेवून पुणे ग्रामीण पोलिसांकडून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या अभियानास विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अविनाश शिळीमकर यांच्यासह औंध जिल्हा रुग्णालय, विविध व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रे, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि समुपदेशन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये चारुशिला कडू, मोहिनी भोसले, रोनीता घोष, अॅड. अर्चना किलोस्कर, सुशीलाताई मोरे, डॉ. प्रशांत हनमघर, डॉ. पियुष येजरे, निलेश शिंदे, विशाल शिंदे, डॉ. विजय मोरे, योगेश जाधव, हर्षल जोशी, द्विजेन स्मार्त, डॉ. किरण चव्हाण, डॉ. गायत्री कोटबागी, मकरंद के., मुकुंद के., नामदेव भोसले, संतोष नाना डोळस यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
व्यसनमुक्त समाजासाठी पोलिसांची कारवाई आणि समाजाचे सहकार्य या दोन्हींची सांगड घालून पुढील काळात हे अभियान अधिक व्यापक करण्याचा पुणे ग्रामीण पोलिसांचा प्रयत्न आहे.
Editer sunil thorat



