
हवेली : पंचायत समिती हवेली तसेच विविध माध्यमातून मंजूर झालेल्या हवेली तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके व आमदार बापूसाहेब पठारे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
या भूमिपूजन कार्यक्रमांतर्गत आव्हाळवाडी, मांजरीखुर्द, कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळीकांचन, या गावांमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून विकासकामांना सुरुवात करण्यात आली.
हवेली तालुक्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच पालखी मार्गांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. गावागावातील मूलभूत प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या विकासकामांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी बोलताना पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज हिरामण काकडे म्हणाले, “हवेली तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध आहे.
आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्यातील गावागावात विकासगंगा पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील.”
भूमिपूजन कार्यक्रमास आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, पंचायत समिती सदस्य कृषीराज चौधरी, सुदर्शन चौधरी, अमोल टेकाळे, सुषमा संतोष मुरकुटे, कोमल गणेश कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, उपअभियंता निरंजन जाधव यांच्यासह विविध गावांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आव्हाळवाडी, मांजरीखुर्द, कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळीकांचन, येथील स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. विकासकामांच्या भूमिपूजनामुळे संबंधित गावांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मंजूर कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.
Editer sunil thorat





