कवडी माळवाडीतील सिद्धिविनायक पार्कमध्ये ड्रेनेज विकासकामांना सुरुवात
पंचायत समिती सभापती युवराज काकडे, जि.प. सदस्या शितल कांबळे व पं.स. सदस्य अमोल टेकाळे यांच्या हस्ते भूमिपूजन

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पंचायत समिती हवेलीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कदमवाकवस्ती येथील कवडी माळवाडी परिसरातील स्टार सिटी सिद्धिविनायक पार्क सोसायटीमधील ड्रेनेज विकासकामांचा भूमिपूजन समारंभ रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, पंचायत समिती सभापती युवराज हिरामण काकडे आणि पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
कवडी माळवाडी परिसरातील स्टार सिटी सिद्धिविनायक पार्क सोसायटीमधील ड्रेनेज व्यवस्थेच्या विकासकामामुळे नागरिकांची सांडपाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून या विकासकामाला सुरुवात करण्यात आली.
या विकासकामासाठी स्टार सिटी सिद्धिविनायक पार्क सोसायटीचे सर्वेसर्वा हभप सुशील महाराज काळभोर यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लागावा, यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, विकासकामाला गती मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कवडीपाट माळवाडी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांना आवश्यक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ड्रेनेज विकासकाम महत्त्वाचे ठरणार आहे.
“जनतेशी बांधील असून विकासाला प्राधान्य देणार”
यावेळी बोलताना पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज हिरामण काकडे म्हणाले, “या उद्घाटन कार्यक्रमाला येताना काही अडचणी आल्या. मात्र, मी जनतेशी बांधील असून नागरिकांच्या विकासाला माझे प्राधान्य आहे. भविष्यातही हवेली तालुक्यातील विविध गावांमध्ये आवश्यक विकासकामांना प्राधान्य देऊन ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रत्येक गावातील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध आहे.”
या भूमिपूजन कार्यक्रमास सभापती युवराज काकडे, जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, हभप सुशील महाराज काळभोर, अँड. सुजीत कांबळे, अँड. राहुल झेंडे, प्रतीक काळभोर, विशाल गुजर, शाहिर महेश खुळपे, राहुल जोगदंड, दिगंबर जोगदंड, अशोक शिंदे, रणधीर घोरपडे यांच्यासह कवडी माळवाडी परिसरातील पाटील, नागरिक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिर महेश खुळपे यांनी करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
Editer sunil thorat






