
कदमवाकवस्ती, (ता.हवेली) : नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची श्रद्धा असलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील श्रीमंत छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ ट्रस्टच्या गणरायाचे सोमवारी (ता. १४) मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आगमन झाले. गेल्या ११ वर्षांपासून मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असून, धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांची परंपराही मंडळाने जपली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या कदमवाकवस्तीतील संभाजीनगर परिसरात २०१५ मध्ये ग्रामपंचायत सदस्य अविनाश ऊर्फ पप्पू बडदे यांच्या पुढाकारातून मंडळाची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासूनच मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड दिली आहे. रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, नवमतदार नोंदणी शिबिर यांसह विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
गेल्या ११ वर्षांत भाविकांना आलेल्या अनुभवांमुळे या गणरायाबद्दलची श्रद्धा अधिक दृढ झाली असून, मंडळाच्या गणपतीला ‘नवसाचा गणपती’ अशी ओळख मिळाली आहे. दरवर्षी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी तसेच चांदीच्या वस्तू गणरायाच्या चरणी अर्पण केल्या जातात. यंदाही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दान अर्पण केले आहे. साधना बँकेचे संचालक बाळासाहेब कोळपे यांनी ७ लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट, केतन साठे यांनी ५७ हजार रुपये किमतीचे चांदीचे सोंडमुख, तर उत्सवप्रमुख ऋषिकेश काळभोर यांनी ७१ हजार रुपये किमतीचा चांदीचा हार, काळभोर लॅान्स चे मालक युवा नेते पृथ्वीराज काळभोर यांना चांदिचा हार 250000 लाखाचा अर्पण केला.
गेल्या ११ वर्षांत गणरायाच्या चरणी तब्बल १६ ते १७ लाख रुपये किमतीची चांदी प्राप्त झाली असून, यामध्ये चांदीचा मूषक तसेच अन्य चांदीच्या वस्तूंचाही समावेश आहे. भाविकांकडून अद्यापही चांदीच्या वस्तू व देणगी अर्पण करण्याचा सिलसिला सुरू असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात महिलांसाठी पैठणी, मंगळागौरी आणि ‘होम मिनिस्टर’ यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व बुद्धिबळ स्पर्धा घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. दरवर्षी पारंपरिक क्रीडा प्रकारांचाही समावेश केला जातो. यंदाच्या उत्सवाच्या अध्यक्षपदी यश साकोरे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत मरगुत्ती, तर उत्सवप्रमुखपदी बाबाराजे भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाला सोमवारी पारंपरिक आगमन मिरवणुकीने सुरुवात झाली. मंगळवारी (ता. १५) उद्घाटन व बालमेळावा, बुधवारी (ता. १६) मंगळागौरी स्पर्धा, गुरुवारी (ता. १७) चित्रकला स्पर्धा, शुक्रवारी (ता. १८) ‘महाराष्ट्राची लोकधारा’, शनिवारी (ता. १९) प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान, रविवारी (ता. २०) महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ आणि सोमवारी (ता. २१) डान्स शो आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. २२) लहान व मोठ्या गटांसाठी डान्स स्पर्धा होणार असून, बुधवारी (ता. २३) सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा दरवर्षी तीन ते चार हजार भाविक लाभ घेतात. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर परिसरातील रेनबो स्कूलशेजारी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष यश साकोरे यांनी दिली.
Editer sunil thorat






