
नागरिकांनो लक्ष द्या! स्वयंपाकाच्या गॅसचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून महत्त्वाचा नियम लागू झाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरवर मिळणारे अनुदान आणि नियंत्रित किरकोळ विक्री दराचा लाभ घेण्यासाठी आता बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. केंद्राच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत स्पष्ट केले आहे.
अनुदानित LPG साठी आधार प्रमाणीकरण आवश्यक
१ ऑक्टोबरपासून ज्या ग्राहकांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, त्यांना लागू अनुदानासह नियंत्रित किरकोळ विक्री दरात रिफिल बुक करण्यासाठी आधी प्रमाणीकरण पूर्ण करावे लागेल. मात्र, आधार प्रमाणीकरण झाले नाही म्हणून घरगुती ग्राहकाला LPG मिळणारच नाही, असे नाही. अशा ग्राहकांना लागू बाजारभावाने LPG मिळू शकतो.
प्रमाणीकरण कुठे कराल?
ग्राहकांना बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणासाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाण्याचीच आवश्यकता नाही. सिलिंडरच्या डिलिव्हरीच्या वेळी डिलिव्हरी कर्मचाऱ्यामार्फत, संबंधित वितरकाच्या शोरूममध्ये किंवा तेल कंपन्यांच्या अधिकृत मोबाइल ॲपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
Indane — IndianOil ONE
Bharatgas — HelloBPCL
HP Gas — HP PAY
या माध्यमातून घरबसल्या प्रमाणीकरण करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
किती ग्राहकांचे प्रमाणीकरण पूर्ण?
सरकारच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत देशातील २७.४३ कोटी म्हणजेच ८९.९ टक्के सक्रिय घरगुती LPG ग्राहकांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले होते. ज्यांचे प्रमाणीकरण आधीच झाले आहे, त्यांना पुन्हा ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.
२५ दिवसांच्या नियमाबाबत महत्त्वाची माहिती
दरम्यान, सोशल मीडिया आणि काही वृत्तांमध्ये घरगुती LPG रिफिल बुकिंगचा कालावधी सर्वांसाठी ४५ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने मार्च २०२६ मध्ये हा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. अधिकृत स्पष्टीकरणानुसार सध्या शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांची विद्यमान व्यवस्था कायम आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून देशभरातील सर्व ग्राहकांसाठी २५ दिवसांचा नवा नियम लागू झाला आहे, असे म्हणणे अचूक ठरणार नाही.
PNG बाबतही महत्त्वाचा बदल
LPG आणि PNG संदर्भातही २०२६ मध्ये नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. सरकारच्या मे २०२६ च्या अधिसूचनेनुसार, PNG कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांना LPG कनेक्शनबाबत पर्याय देण्यात आले आहेत. PNG उपलब्ध झाल्यानंतर LPG कनेक्शन बंद करण्यासाठी ३० दिवसांत अर्ज करता येतो किंवा भविष्यात PNG नसलेल्या भागात LPG कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी ट्रान्सफर व्हाउचर घेता येते. त्यामुळे “PNG उपलब्ध असलेल्या भागातील प्रत्येक ग्राहकाचे LPG कनेक्शन ९० दिवसांनी आपोआप बंद होईल” असा सरसकट दावा अधिकृत माहितीत आढळत नाही.
ग्राहकांनी काय करावे ?
तुमच्या LPG कनेक्शनचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही, हे तपासा. प्रमाणीकरण झाले नसेल तर संबंधित गॅस एजन्सी, डिलिव्हरी कर्मचारी किंवा अधिकृत OMC ॲपच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करा. त्यामुळे लागू अनुदानित दरातील रिफिल बुकिंगमध्ये अडथळे येण्याची शक्यता टाळता येईल.
Editer sunil thorat



