
हडपसर (पुणे), दि. १७ जून : प्रागतिक इतिहास संस्था, महाराष्ट्र आणि एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दीनिमित्त आयोजित ‘महात्मा जोतीराव फुले संशोधनाच्या नव्या दिशा’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रागतिक इतिहास संस्थेचे वार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले.
चर्चासत्राच्या बीजभाषणात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. उमेश बगाडे यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचे सुघटित व सुसंगत सिद्धांतन करण्याची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुले यांच्या विचारांचे व्यापक आणि शास्त्रीय सिद्धांतन करण्याचा विशेष प्रकल्प प्रागतिक इतिहास संस्था, महाराष्ट्रच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) किशोर काकडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्था ही सत्यशोधक चळवळीच्या विचारातून उभी राहिल्याचे सांगत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा फुले यांच्या शैक्षणिक विचारांचा व्यापक प्रसार आणि विस्तार घडवून आणल्याचे नमूद केले.
दुसऱ्या सत्रात बापूराव घुंगरगांवकर यांनी ‘सत्यशोधकांचे प्राथमिक शिक्षणातील योगदान’ या विषयावर भाष्य करत एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील शैक्षणिक परिवर्तनाचा आढावा घेतला. सागर नाईक यांनी ‘महात्मा जोतीराव फुले आणि वैश्विकता’ या विषयावर फुले यांच्या वैश्विक विचारांचे विवेचन केले. तर स्वप्नील तांबे यांनी ‘महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारातील बंधुत्वभाव’ या विषयावर मांडणी करत समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. बाळासाहेब केंदळे यांनी भूषविले.
यावेळी प्रागतिक इतिहास संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा. डॉ. बाळासाहेब केंदळे, उपाध्यक्षपदी डॉ. प्रकाश सिरसट, सचिवपदी डॉ. कमलेश बेडसे, सहसचिवपदी डॉ. अजय अहिर आणि खजिनदारपदी डॉ. श्रीहरी थोरवत यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून डॉ. उमेश बगाडे, डॉ. नारायण भोसले, डॉ. देवेंद्र इंगळे, डॉ. सुवर्णमाला म्हस्के, डॉ. सर्जेराव बनसोडे आणि डॉ. संतोष सुरडकर यांची निवड झाली.
समारोप सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एकनाथ मुंढे यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या सामाजिक आणि शैक्षणिक संदर्भातील उपयुक्तता अधोरेखित केली. तसेच प्रागतिक इतिहास संस्थेच्या आगामी उपक्रमांना रयत शिक्षण संस्था व एस. एम. जोशी महाविद्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
या राष्ट्रीय चर्चासत्रास राज्यातील विविध भागांतील प्राध्यापक, संशोधक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय अहिर आणि डॉ. सुवर्णमाला म्हस्के यांनी केले. डॉ. कमलेश बेडसे यांनी आभार मानले, तर चर्चासत्राचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. दिनकर मुरकुटे यांनी कार्य पाहिले.
Editer sunil thorat



