
कुंजीरवाडी (ता. हवेली) : पुणे–सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथे नव्याने मंजूर करण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या अधिकृत बस थांबा (स्टॉप) फलकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या बस थांब्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच विविध धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
कुंजीरवाडी येथे एसटी बस थांबा मंजूर व्हावा यासाठी शिवसेना तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून पुणे–सोलापूर मार्गावरील धावणाऱ्या सर्व एसटी बसेस आता कुंजीरवाडी येथे नियमित थांबणार आहेत.
या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी दूरवर जावे लागणार नाही. विशेषतः पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर यांसारख्या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांनी समाधान व्यक्त करत आनंद साजरा केला. तसेच विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना व दैनंदिन प्रवाशांनाही या बस थांब्याचा मोठा लाभ होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमावेळी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाहतूक निरीक्षक सूरज हुंबे, खळदकर तसेच कार्यालयीन कामकाज अधिकारी आयशा शेख उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी बस थांब्यावर थांबलेल्या एसटी चालक-वाहकांना तसेच प्रवाशांना आवश्यक सूचना देत नव्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण कुंजीर, शिवसेना तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर पाटील, सचिव दत्तात्रय कुंजीर, डॉ. राजाराम रायकर, रामदास कुंजीर, नंदकुमार कुंजीर, आप्पा शेलार, फुलचंद कुंजीर, सागर झेंडे, सुरेश सावंत, योगेश झेंडे, विष्णू नरके, नारायण बंडगर यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी कुंजीरवाडीसाठी मंजूर झालेला एसटी बस थांबा हा गावाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत, यामुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल आणि नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.
ठळक मुद्दे खालील प्रमाणे
👉🏻कुंजीरवाडी येथे एसटी बस थांबा अधिकृतपणे सुरू
👉🏻पुणे–सोलापूर मार्गावरील बसेस आता येथे थांबणार
👉🏻स्वप्नील कुंजीर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
👉🏻भाविक, विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय दूर होणार
👉🏻एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उद्घाटनावेळी सत्कार
Editer sunil thorat




