“डुडींच्या पारदर्शक बदली प्रक्रियेलाच सुरुंग? महसूल विभागातील ‘अदृश्य हातां’मुळे खळबळ; आदेशात फेरफार झाल्याचा गंभीर आरोप!”

पुणे : महसूल विभागातील बदल्यांमध्ये पारदर्शकता आणत आदर्श निर्माण करणारे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कारभारालाच आता त्यांच्या अधिपत्याखालील काही अधिकाऱ्यांनी सुरुंग लावल्याची चर्चा महसूल वर्तुळात रंगू लागली आहे. समुपदेशन प्रक्रियेत निश्चित झालेल्या नियुक्त्या आणि प्रत्यक्ष बदली आदेशांमध्ये मोठी तफावत आढळल्याचा आरोप होत असून, या प्रकरणामुळे संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी डुडी यांनी वशिलेबाजी, राजकीय दबाव आणि घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्ष आदेश निघाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसला.
सुत्रांच्या माहितीनुसार, समुपदेशनावेळी इंदापूर तालुक्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आदेशात जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती देण्यात आली. तर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी निश्चित झालेल्या एका कर्मचाऱ्याला थेट पुरंदर तालुक्यात मंडल अधिकारीपदी पाठविण्यात आले. एवढेच नव्हे तर एका ग्राम महसूल अधिकाऱ्याचा तलाठी सजाही बदलण्यात आल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
या प्रकारानंतर महसूल विभागातील विविध व्हॉट्सअप समूहांवर नाराजीचा सूर उमटू लागला आहे. “समुपदेशनात ठरलेले आदेश बदलले कोणी?”, “झारीतील शुक्राचार्य नेमके कोण?” आणि “जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला का?” अशा प्रश्नांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या स्वच्छ प्रतिमा आणि कडक प्रशासनशैलीचे सर्वत्र कौतुक होत असताना, त्यांच्या नावालाच तडा जाईल असा प्रकार काही अधिकाऱ्यांकडून झाला का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे अनेक कर्मचारी उघडपणे बोलण्यास धजावत नसल्याचीही चर्चा आहे.
प्रशासनाची धावपळ?
दरम्यान, या कथित फेरफाराबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनात मोठी हालचाल सुरू झाल्याचे दिसून आले. संबंधित वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत तब्बल पाच नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, वृत्त दाबण्यासाठी दाखवलेली ही तत्परता बदल्यांमधील कथित गैरप्रकार रोखण्यासाठी का दाखवली गेली नाही?
महसूल विभागातील बदल्यांच्या या गूढ प्रकरणामागील सत्य काय, जिल्हाधिकाऱ्यांना याची पूर्वकल्पना होती का, आदेशांमध्ये बदल कोणी केले आणि संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनातील या कथित फेरफाराचा पडदा उघडणार की प्रकरण दडपले जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.
Editer sunil thorat



