तुकाराम मुंढेंचा धडाका; मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित…

मुंबई, दि. 30 : अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका घेत मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि क्लबवर मोठी कारवाई केली आहे. नियमभंग आढळून आल्याने संबंधित आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
एफडीएच्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान नरिमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले. त्यामुळे संबंधित रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला. तसेच बोरीवली येथील एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरण सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या आस्थापनेवरही कारवाई करण्यात आली.
याशिवाय भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरातील काही हॉटेल्स व आस्थापनांवरही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांना शंका असल्यास त्यांनी एफडीएच्या टोल-फ्री क्रमांक 1800-222-365 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, एफडीएच्या कारवाईचा धसका घेत काही भामट्यांनी स्वतःला एफडीए अधिकारी असल्याचे भासवून बोरीवलीतील एका हॉटेलवर धाड टाकल्याची घटना समोर आली आहे. बनावट ओळखपत्र दाखवत कारवाईची धमकी दिल्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर बोगस अधिकारी असल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहक हिताच्या दृष्टीने तुकाराम मुंढे यांनी सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट्सना ग्राहकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. बाटलीबंद पाणी ग्राहकाने मागणी केल्यासच द्यावे आणि मोफत पिण्याच्या पाण्याबाबतचा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उल्लेखनीय म्हणजे, तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षा नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर देत राज्यभर धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.
Editer sunil thorat



