इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी अनिवार्य; नियम मोडणाऱ्या शाळांवर कडक कारवाई : शिक्षणमंत्री दादा भुसे…

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून, या नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भुसे म्हणाले की, राज्य सरकारने सर्व शाळांना मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील. तसेच राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.
यावेळी अनेक आमदारांनी काही शाळांमध्ये अद्याप मराठी विषय अनिवार्य नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच नियम मोडणाऱ्या शाळांवरील विद्यमान दंड अत्यल्प असल्याने त्यात वाढ करून प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली.
शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहे. तपासणीत नियमभंग आढळल्यास संबंधित शाळा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
याशिवाय, शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा अधिक व्यापक समावेश करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी काही शिक्षण मंडळांच्या पुस्तकांमध्ये शिवचरित्राला अत्यल्प जागा होती; मात्र आता केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर त्याचा विस्तार सुमारे २२ पानांपर्यंत करण्यात आला असून विद्यार्थ्यांना शिवरायांचे कार्य, विचार आणि इतिहास अधिक सविस्तरपणे समजण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषा बळकट करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे, हे राज्य सरकारचे प्राधान्य असल्याचा पुनरुच्चार शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केला.
Editer sunil thorat



