अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेकांचे परवाने निलंबित…

पुणे, दि. ३० : अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात मोठी धडक कारवाई करत १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला आहे. २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल आस्थापनांची विशेष तपासणी करण्यात आली.
शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२ हजार २७८ लिटर दूध नष्ट करण्यात आले. तसेच संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
आंबेगाव तालुक्यातील उमिया मिल्क प्रॉडक्ट येथे अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने १ हजार १५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधित अन्न परवानाही निलंबित करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाईचे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे १ हजार ८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूधही नष्ट करण्यात आले असून संबंधित परवाना निलंबित करण्यात आला.
दरम्यान, पुण्यातील ताथवडे येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या आस्थापनात अन्न सुरक्षा नियमांतील गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना उत्पादनावरील लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Editer sunil thorat





