दूध भेसळखोरांनो सावधान! तुकाराम मुंढेंचा कडक दणका; राज्यभर ८ नियम लागू, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा…

मुंबई | दि. ३ जुलै : राज्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ, निकृष्ट दर्जा आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर लागू होणारा सर्वंकष अनुपालन आदेश जारी करत दूध पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकाला कठोर नियमांचे पालन बंधनकारक केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांच्या ताटात सुरक्षित, शुद्ध, सकस आणि भेसळमुक्त दूध पोहोचणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. त्यामुळे शेतापासून ते ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण दूध पुरवठा साखळीवर आता कडक देखरेख ठेवली जाणार असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
सर्वांसाठी बंधनकारक ८ नियम…
– नोंदणी (Registration) व परवाना (Licence)
– अन्न उत्पादन मानके व संयोजके
– दूषके व अवशेष नियंत्रण
– विक्रीवरील प्रतिबंध व निर्बंध
– लेबलिंग व प्रदर्शन नियम
– पॅकेजिंगसाठी अन्न सुरक्षा मानके
– अन्नाचे फोर्टिफिकेशन
– जाहिरात व दाव्यांवरील नियम
कोणाला लागू होणार आदेश?
दूध संकलन केंद्रे, शीतकरण केंद्रे, दुग्धप्रक्रिया उद्योग, UHT युनिट्स, पॅकर्स, फिलिंग स्टेशन्स, वितरक, वाहतूकदार, किरकोळ विक्रेते, स्वयंचलित दूध विक्री केंद्रे तसेच पनीर, खवा, तूप, लोणी, क्रीम, दही, चीज, दूध पावडर, फ्लेवर्ड मिल्क आणि आईस्क्रीम उत्पादक व विक्रेते या सर्वांना हा आदेश लागू राहणार आहे.
स्वच्छता आणि गुणवत्ता तडजोडीशिवाय…
मुंढे यांनी स्पष्ट केले की, दूध प्रक्रिया केंद्रे धूर, कीटक आणि दूषितीकरणाच्या संभाव्य स्रोतांपासून दूर असणे आवश्यक आहे. दूध स्वीकारणे, शीतकरण, प्रक्रिया, साठवणूक आणि वाहतूक या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेचे कठोर पालन करावे लागेल. दुधाच्या संपर्कात येणारी सर्व भांडी, पाइप आणि टाक्या फूड-ग्रेड असणे बंधनकारक असेल.
उंदीर व कीटक नियंत्रणासाठी ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबविण्यात येणार आहे. कच्चे दूध केवळ नोंदणीकृत पुरवठादारांकडूनच खरेदी करावे लागेल. त्याची संपूर्ण नोंद ठेवणे बंधनकारक असेल. कच्चे दूध दोन तासांच्या आत कोल्ड चेनमध्ये आणणे आणि बाटल्या मशीनद्वारेच सीलबंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या तपासणीत धक्कादायक प्रकार…
राज्यभर झालेल्या तपासण्यांमध्ये दुधात पाण्याची भेसळ, कृत्रिम (Synthetic) दूध विक्री, युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, मेलामाइन यांसारख्या रसायनांचा वापर, फॅट व SNF मानकांचे उल्लंघन, Aflatoxin M1 व Antibiotic Residues, शीतसाखळीचे उल्लंघन, विनापरवाना व्यवसाय आणि चुकीचे लेबलिंग अशा गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य…
राज्य सरकारच्या या आदेशाचा उद्देश केवळ भेसळ रोखणे नाही, तर ग्राहकांचा विश्वास वाढवणे, प्रामाणिक दूध व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि आधुनिक अन्न सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करणे हा आहे.
“दूध भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
Editer sunil thorat



