नसरापूर अत्याचार प्रकरणाचा धाडसी तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांचा शिवसेनेकडून सन्मान

उरुळी कांचन : नसरापूर अत्याचार प्रकरणाचा अत्यंत धाडसी व कर्तव्यदक्ष तपास करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांचा आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या हवेली तालुक्याच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेना हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील कुंजीर पाटील यांनी सांगितले की, नसरापूर अत्याचार प्रकरण अत्यंत किचकट आणि संवेदनशील होते. मात्र पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर या प्रकरणाचा सखोल तपास करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा होतो. न्यायाची अपेक्षा करणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी झटणाऱ्या रणरागिणी विजयमाला पवार यांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सत्कार समारंभास शिवसेना हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील कुंजीर पाटील, उरुळी कांचन शहरप्रमुख सचिन कांचन, उपतालुकाप्रमुख अनिल कदम, ज्येष्ठ शिवसैनिक लालासो तुपे, वाहतूक सेना अध्यक्ष विष्णू नरके, युवासेनेचे अवधूत राऊत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्यात पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.



