पाकिस्तानला मोठा धक्का? बलुचिस्तानने ‘स्वतंत्र देश’ घोषित केल्याचा दावा; सोशल मीडियावर व्हायरल पत्रकाची चर्चा…

सोशल मीडिया : बलुचिस्तान प्रांताने स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केल्याचा दावा करणारे एक पत्रक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पत्रकात ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’च्या संरक्षण आणि सुरक्षा दलांनी बलुचिस्तानच्या सुमारे ८५ टक्के भूभागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत किंवा स्वतंत्र पुष्टी मिळालेली नाही.
१३ जुलै २०२६ दिनांक असलेल्या या कथित पत्रकात बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आल्याचा उल्लेख असून, स्वतंत्र राष्ट्रगीत, राष्ट्रीय ध्वज आणि ‘बलोची फालूस’ नावाचे चलन जाहीर केल्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच सोने, तांबे, गॅस आणि कोळसा संसाधनांवर नियंत्रण मिळवल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकानुसार, बलुचिस्तानने स्वतःच्या लष्कर, नौदल, हवाई दल आणि नागरी प्रशासनाची स्थापना केल्याचा दावा केला असून, २०२६ अखेरपर्यंत पाकिस्तानला आपल्या भूभागातून बाहेर हाकलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्करातील बलुच नागरिक राजीनामे देत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, बलुचिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवादी चळवळ, हिंसाचार आणि पाकिस्तानविरोधी असंतोष सुरू आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन, जबरदस्तीने बेपत्ता करण्यात येणाऱ्या व्यक्ती आणि दडपशाहीच्या आरोपांमुळे हा प्रदेश सातत्याने चर्चेत राहिला आहे.
मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रकातील दाव्यांची अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नसून, बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून कोणत्याही प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थेने किंवा देशाने मान्यता दिल्याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या दाव्याकडे सावधगिरीने पाहण्याची गरज आहे.
- Editer sunil thorat




