महाराष्ट्रासह २२ राज्यांना हवामान खात्याचा मोठा अलर्ट; ताशी ६० किमी वेगाने वारे, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा…

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह देशातील २२ राज्यांसाठी मोठा हवामान अलर्ट जारी केला आहे. पुढील १२ तासांत अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम पूर्व, ईशान्य तसेच उत्तर भारतातील अनेक राज्यांवर होऊ शकतो. काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह २२ राज्यांना सतर्कतेचा इशारा
१५ ते २० जुलैदरम्यान दिल्ली, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे १५ ते १७ जुलैदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
ओडिशात अतिवृष्टीची शक्यता
१५ जुलै रोजी ओडिशातील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पूर्व आणि ईशान्य भारत, पूर्व उत्तर प्रदेश तसेच पश्चिम हिमालयीन भागात पुढील सात दिवस पावसाचे प्रमाण वाढू शकते.
महाराष्ट्रात स्थिती कशी?
मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची तीव्रता सध्या फार सक्रिय राहणार नसल्याचे संकेत आहेत. मात्र काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठवाड्यात पावसाअभावी पेरण्या रखडल्याची स्थिती असून, परिस्थिती कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
२० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाचा जोर हवामानातील पुढील बदलांवर अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांसाठी सावधगिरी
वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा असुरक्षित ठिकाणी थांबू नये.
विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या मैदानात जाणे टाळावे.
नदी, नाले आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून जाण्यापूर्वी खबरदारी घ्यावी.
स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
हवामान विभागाच्या पुढील अपडेट्सनुसार परिस्थितीत बदल होऊ शकतो. नागरिकांनी अधिकृत अंदाज आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.
Editer sunil thorat



