विश्वासाला तडा! बालाजी मंदिरातील पुजाऱ्यानेच ६ लाखांच्या चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला

पुणे : भवानी पेठेतील श्री बालाजी मंदिरात विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरातील पुजाऱ्यानेच गाभाऱ्यातील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे साडेसहा किलो चांदीचे दागिने आणि आभूषणे चोरून फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १३ जुलै रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडली असून, संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याप्रकरणी बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव जाधव (वय ६४, रा. वडकीनाला, ता. हवेली) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेशदास पांडे (वय ४५, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेशदास पांडे हा गेल्या १५ ते २० दिवसांपासून मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत होता आणि मंदिर परिसरातच वास्तव्यास होता. पहाटेच्या वेळी संधी साधून त्याने गाभाऱ्यात ठेवलेले चांदीचे दागिने व आभूषणे चोरून तेथून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत.



