दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीला शासकीय मान्यता; २२ जुलैपासून राज्यभर अधिकृत कार्यक्रम

मुंबई : राज्य शासनाने दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश २०२६ सालातील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले असून, दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर त्यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.
परिपत्रकानुसार, मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. तसेच शाळा, महाविद्यालये आणि विविध शासकीय संस्थांमध्येही त्यांच्या कार्याचा गौरव करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने तातडीने परिपत्रक जारी करून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
राज्य शासनाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना जयंती कार्यक्रमांचे योग्य नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर मजबूत पकड, पायाभूत सुविधांच्या विकासाला दिलेली गती आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहणारे आणि प्रशासनाकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.
शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या कार्याला अधिकृत शासकीय मानवंदना मिळाली असून, दरवर्षी २२ जुलै रोजी त्यांच्या लोकसेवेचा वारसा आणि महाराष्ट्राच्या विकासातील योगदान राज्यभर स्मरणात ठेवले जाणार आहे.
Editer sunil thorat



