ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व अत्याचारपीडितांसाठी दिलासादायक निर्णय; सर्व पोलीस ठाण्यांत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती…

पुणे : ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक तसेच अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचारपीडित नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ व प्रभावी निवारण व्हावे, यासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी संबंधित नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करतील.
तसेच, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक आणि अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचारपीडितांना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, त्यांना सन्मानपूर्वक व संवेदनशील वागणूक मिळावी आणि त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
या सुविधेचा लाभ संबंधित नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.



