
लोणी काळभोर, (ता. हवेली) दि. १७ : देशातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘LogIQids’ राष्ट्रीय मेंटल ॲप्टीट्यूड ऑलिम्पियाड परीक्षेत लोणी काळभोर येथील कु. प्रमित प्रसाद बोरकर याने उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण देशात ११३ वा क्रमांक पटकावला आहे. या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आयआयटी आणि आयआयएमच्या माजी विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रमितने उत्कृष्ट कामगिरी केली. या परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी उणे गुणांची तरतूद असून प्रश्नांची कठीण पातळीही अधिक असतानाही प्रमितने आपल्या तार्किक विचारशक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर हे यश मिळवले.
प्रमित हा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कै. भगवंत जयवंत बोरकर गुरुजी यांचा पणतू असून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील मुख्य अधिकारी प्रसाद दिलीपराव बोरकर यांचा मुलगा आहे. तो सध्या कल्याण येथील सेंट लॉरेन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे.
या यशाचे श्रेय प्रमितने आपल्या आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.
‘LogIQids’ ही संस्था विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्या सोडविण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. या उपक्रमाला आयआयटी मुंबईच्या Techfestचे सहकार्य लाभले असल्याने या परीक्षेला राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
प्रमितच्या या यशाबद्दल त्याचे नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत असून, त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
Editer sunil thorat



