वाकवस्तीतील SIR मोहिमेत बीएलओंच्या कारभारावर संशय; महिला मतदाराला धाक, आधार झेरॉक्स नाकारले, ‘पाहुण्या राऊळ्यांना मतदान करायचे असते’ वक्तव्याने नवा वाद…
राजकुमार भोरे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा सवाल; एकाच मोहिमेत वेगवेगळे निकष का? निष्पक्ष चौकशीची मागणी...

कदमवाकवस्ती (ता. हवेली), दि. १८ जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पडताळणी (Special Intensive Revision – SIR) मोहिमेदरम्यान जिल्हा परिषद वाकवस्ती येथील मतदान केंद्रावर बीएलओ (Booth Level Officer) राजकुमार भोरे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका महिला मतदाराशी अयोग्य वर्तन करून मानसिक दबाव टाकल्याचा आरोप समोर आला असतानाच, अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेतही वेगवेगळे निकष वापरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण मतदार पडताळणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत स्थानिकांमध्ये शंका निर्माण झाली असून, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी होत आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार पडताळणी मोहिमेअंतर्गत कदमवाकवस्ती पालखी स्थळावर मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. या प्रक्रियेत नागरिकांकडून पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे स्वीकारून पडताळणी केली जात आहे. तालुक्यातील अनेक केंद्रांवर बीएलओ नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून अर्ज भरून घेत असल्याचे चित्र दिसून असताना मात्र, वाकवस्ती येथील केंद्रावरील कार्यपद्धती इतर केंद्रांपेक्षा वेगळी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इतर मतदान केंद्रांवर अर्जासोबत आधार कार्डच्या झेरॉक्स प्रती स्वीकारल्या जात असताना, वाकवस्ती केंद्रावर बीएलओ राजकुमार भोरे यांनी अर्ज भरून घेतले; मात्र आधार कार्डच्या झेरॉक्स प्रती स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे एकाच निवडणूक मोहिमेत एकाच प्रकारच्या अर्जांसाठी वेगवेगळे निकष का वापरले गेले, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्यास नकार देण्यामागे नेमके कारण काय होते, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणीही होत आहे.
दरम्यान याच केंद्रावर आलेल्या एका महिला मतदारानेही गंभीर आरोप केले होते. संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला बराच वेळ अर्ज न देता थांबविण्यात आले. त्यानंतर अर्ज देताना बीएलओ राजकुमार भोरे यांनी तिच्याकडे वारंवार मॅपिंग, पूर्वीचे मतदान, मतदार नोंदणी, दुहेरी नोंदणी तसेच तहसीलदार कार्यालयातील सुनावणी याबाबत प्रश्न विचारून मानसिक दबाव निर्माण केला.
महिलेचा आरोप आहे की, “दोन्हीकडे मतदानाची नोंद असेल तर तहसीलदार कार्यालयात सुनावणी होईल”, “संगणक प्रणालीमध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे”, “चुकीची माहिती दिल्यास शासनाची फसवणूक मानली जाऊ शकते”, “पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल” अशा स्वरूपाची विधाने करण्यात आली. या प्रकारामुळे आपण घाबरून गेलो आणि पडताळणी प्रक्रियेऐवजी भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची भावना संबंधित महिलेने व्यक्त केली आहे.
याच प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बीएलओ राजकुमार भोरे यांनी “पाहुण्या राऊळ्यांना मतदान करायचे असते,” अशा आशयाचे वक्तव्य केले. या वक्तव्याचा नेमका संदर्भ काय होता, हे स्पष्ट नसले तरी अशा प्रकारचे विधान निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडून होणे योग्य नसल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली असून, यामागे कोणता हेतू होता, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काही नागरिकांनी असा संशय व्यक्त केला आहे की, या केंद्रावर राबविण्यात आलेली कार्यपद्धती आणि करण्यात आलेली विधाने यामागे कोणताही राजकीय हेतू होता का? एखाद्या विशिष्ट गटाला फायदा अथवा तोटा व्हावा, या उद्देशाने काम केले जात होते का, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या संशयाला दुजोरा देणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष मतदार पडताळणी ही नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि सहकार्याच्या भूमिकेतून राबविणे अपेक्षित आहे. नागरिकांना धाकदपटशा न करता योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्या शंकांचे समाधान करणे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्ट सूचना देणे ही बीएलओंची जबाबदारी आहे. मात्र, वाकवस्तीतील घडलेल्या कथित प्रकारांमुळे या प्रक्रियेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तहसीलदार, मतदार नोंदणी अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक प्रशासनाने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांबाबत बीएलओ राजकुमार भोरे किंवा संबंधित निवडणूक प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
Editer sunil thorat



