
लोणी काळभोर (ता. हवेली), दि. २१ जुलै : युवक-युवतींमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करून अंमली पदार्थांच्या विळख्यातून त्यांना दूर ठेवण्याच्या उद्देशाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय, लोणी काळभोर येथे अंमली पदार्थविरोधी, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात मंगळवारी (दि. २१) सकाळी १०.३० ते १२ या वेळेत आयोजित कार्यक्रमात इयत्ता ११ वी व १२ वीच्या सुमारे ९० ते १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शरीर व समाजावर होणारे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व, महिला सुरक्षेसंदर्भातील कायदेशीर तरतुदी, तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक, ओटीपी व बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनतर्फे युवक-युवतींमध्ये कायद्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हा कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मेहेर व महिला पोलीस अंमलदार थोरात (सायबर विभाग) यांनी आयोजित केला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य घोडके, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले.
Editer sunil thorat




