मांजरी पोलिसांकडून विद्यार्थी, पालकांसाठी सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा…

मांजरी (पुणे) दि.२१ जुलै : मांजरी पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच सायबर गुन्हे, महिला सुरक्षा आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने श्रीमती कलावती दत्तात्रेय कोतवाल विद्यालय, मांजरी येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक कोठुळे तसेच दामिनी मांजरी मार्शल यांनी सकाळी १०.४० ते १२.०० या वेळेत इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा जाधव यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सायबर फ्रॉडपासून बचाव, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर अवेअरनेस, वाहतूक नियमांचे पालन, मोबाईलचा सुरक्षित वापर आणि वाढत्या बालगुन्हेगारीची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती देण्यात आली.
तसेच बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२, गुड टच-बॅड टच आणि सेफ-अनसेफ टच याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेत ये-जा करताना किंवा शाळेच्या वाहनांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पालक व पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळावा, संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्वरित १०९०, १०९१, ११२ आणि १९३० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले.
यावेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारी, सफाई कर्मचारी व हेल्पर यांची चारित्र्य पडताळणी वेळेत पूर्ण करण्याबाबत शाळा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. तसेच शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करण्यात आली. शाळेतील तक्रारपेटीची तपासणी करण्यात आली असता कोणतीही तक्रार आढळून आली नाही.
शाळा सुटल्यानंतर शाळेच्या परिसरात किंवा प्रवेशद्वाराबाहेर संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासनाला देण्यात आल्या.
या जनजागृती कार्यशाळेला सुमारे २५० ते २७० विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पोलिसांशी संवाद साधत विविध प्रश्न विचारले असून पोलिसांच्या या उपक्रमाचे शाळा प्रशासन व पालकांनी स्वागत केले.
Editer sunil thorat




