
पुणे : राज्य शासनाच्या ‘नशामुक्ती जनजागृती अभियान‘ अंतर्गत चंदननगर पोलीस स्टेशनच्या वतीने व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वडगाव शेरी, पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती जनजागृती कार्यशाळा व नशामुक्ती शपथ कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्यापासून परावृत्त करणे तसेच सुरक्षित, सुदृढ आणि जबाबदार नागरिक घडविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमात चंदननगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बोराडे, गोपनीय अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास मेमाणे, पोलीस हवालदार धुमाळ, दामिनी मार्शल खेसे, महिला पोलीस अंमलदार शितल वानखेडे व वर्षा सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे वाढते जाळे, त्याचे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी माहिती देण्यात आली. अल्पवयात व्यसनाधीन झाल्यास शिक्षण, करिअर, कुटुंब आणि संपूर्ण आयुष्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात, याची जाणीव करून देण्यात आली. तसेच व्यसनापासून दूर राहण्यासाठी चांगल्या मित्रांची संगत, खेळ, व्यायाम, वाचन, कला, संस्कार आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांशी संबंधित कायदेशीर तरतुदी, त्यांचे सेवन, बाळगणे किंवा विक्री करणे याविरोधातील कठोर कायदे तसेच अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी झाल्यास होणाऱ्या कारवाईची माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. कोणत्याही प्रकारचे संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल फोनच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम, सोशल मीडियाचे व्यसन, ऑनलाइन गेम्सचे आकर्षण, वेळेचा अपव्यय, मानसिक ताण आणि अभ्यासावर होणारा परिणाम याविषयीही विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले. मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच करावा आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी सायबर गुन्ह्यांविषयी विशेष जनजागृती करण्यात आली. बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, सोशल मीडियावरील फेक प्रोफाइल, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सायबर बुलिंग, डिजिटल सुरक्षेचे नियम आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
महिला व बाल सुरक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ‘गुड टच – बॅड टच’, ‘सेफ टच – अनसेफ टच’ या संकल्पना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या. कोणत्याही अनुचित प्रकाराला घाबरून न जाता पालक, शिक्षक किंवा पोलीस यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच वाढत्या बालगुन्हेगारीचे स्वरूप, त्यामागील कारणे आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या नैतिक मूल्यांबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग, उपस्थित विद्यार्थी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ‘नशामुक्त भारत – व्यसनमुक्त समाज’ घडविण्याचा संकल्प करत नशामुक्तीची शपथ घेतली. व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या जनजागृती कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग तसेच सुमारे १५० ते १७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. चंदननगर पोलिसांच्या या उपक्रमाचे शाळा प्रशासनाने कौतुक करत भविष्यातही अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Editer sunil thorat




