‘शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरून येणार का?’ इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर भाजप खासदार भडकले

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवरून वाद सुरू आहे. काही वाहन चालकांनी E20 पेट्रोल वाहनांसाठी धोकादायक असल्याचा दावा केला आहे. तर सरकारने हा दावा फेटाळला आहे.
मात्र देशात विविध ठिकाणी या इंधनाला विरोध केला जात आहे. अशातच आता इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर मध्य प्रदेशातील रिवा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा भडकले आहे. त्यांनी एक आक्षेपार्ह विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मध्य प्रदेशातील रिवाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रीत इंधनावर बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. मिश्रा यांनी म्हटले की, ‘युद्ध सुरू आहे आणि होर्मुझ सामुद्रधुनीवर निर्बंध आहेत, असे असतानाही काही लोक इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करत आहेत. देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नसताना ते कुठून आणणार, असा सवाल करत त्यांनी संतापाच्या भरात ‘तुमच्या बापाच्या घरून येणार का?’ अशा शब्दांचा वापर केला. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर मिश्रा भडकले
रविवारी रिवा विमानतळावर दोन नवीन विमानसेवांच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांसह आमदार आणि अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याच कार्यक्रमात मंचावरून संबोधित करताना खासदार जनार्दन मिश्रा यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापराला विरोध करणाऱ्यांना सुनावलं आहे. काही लोक इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करत शुद्ध पेट्रोलची मागणी करत आहेत. यावर बोलताना मिश्रा यांनी म्हटले की, ‘शुद्ध पेट्रोल कुठून येणार, तुमच्या बापाच्या घरून येणार का?’
राजकीय चर्चेला उधाण
खासदार जनार्दन मिश्रा यांच्या या वक्तव्यानंतर आता हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. विशेष म्हणजे, मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अनेक वरिष्ठ नेते उपस्थित असतानाच हे वक्तव्य करण्यात आले. खासदारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून, राजकीय वर्तुळातही यावर चर्चा सुरू झाली आहे. रिवा विमानतळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला आणखी वेग आला आहे.
Editer sunil thorat



