
मुंबई : महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्याचा खर्च आता आणखी वाढला आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे वार्षिक एमबीबीएस शुल्क ७.५० लाख रुपयांपासून तब्बल १७.१३ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे नीटच्या माध्यमातून खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
महाराष्ट्र शुल्क नियामक प्राधिकरणाने (FRA) मंजूर केलेल्या नवीन शुल्क यादीमध्ये राज्यातील १९ खासगी एमबीबीएस महाविद्यालयांचा समावेश आहे. काही महाविद्यालयांच्या शुल्कात वाढ झाली असून, सात महाविद्यालयांनी आपल्या शुल्कात कोणतीही वाढ केलेली नसल्याचे समोर आले आहे.
पालकांना आधीच एमबीबीएसच्या साडेपाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्कासोबतच वसतिगृह, भोजन, पुस्तके, परीक्षा आणि इतर शैक्षणिक खर्चाचा मोठा भार उचलावा लागतो. त्यात वार्षिक शुल्कात झालेली वाढ झाल्याने संपूर्ण अभ्यासक्रमाचा खर्च अनेक लाखांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांच्या शैक्षणिक बजेटवर तसेच शैक्षणिक कर्जाच्या नियोजनावरही परिणाम होणार आहे.
पालघरमधील महाविद्यालय सर्वाधिक महाग
नवीन शुल्कानुसार पालघरमधील वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे सर्वाधिक शुल्क आकारणारे महाविद्यालय ठरले असून, येथे वार्षिक एमबीबीएस शुल्क १७.१३ लाख रुपये आहे. त्यानंतर नागपूरमधील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे वार्षिक शुल्क १५.६२ लाख रुपये आहे.
तर पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये वार्षिक शुल्क ७.५० लाख रुपये असून, सिंधुदुर्गातील एसएसपीएम मेडिकल कॉलेजचे शुल्क ७.६४ लाख रुपये आहे. या दोन्ही महाविद्यालयांमध्ये तुलनेने कमी शुल्क आहे.
विविध महाविद्यालयांचे शुल्क
अमरावती येथील डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयाचे वार्षिक शुल्क ८.९३ लाख रुपये, तर परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क ८.७८ लाख रुपये करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क ९.१३ लाख रुपये, तर के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजचे शुल्क ९.७० लाख रुपये आहे. तळेगाव येथील एमआयएमईआर मेडिकल कॉलेजचे शुल्क ११.०६ लाख रुपये करण्यात आले आहे.
नाशिकमधील एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे शुल्क पूर्वीच्या १३ लाख रुपयांवरून १२.२७ लाख रुपये करण्यात आले आहे. तर नाशिकमधील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे वार्षिक शुल्क १३.१६ लाख रुपये आहे.
सात महाविद्यालयांच्या शुल्कात वाढ नाही
दरम्यान, राज्यातील सात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी २०२६-२७ साठी शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही. यामध्ये एसीपीएम मेडिकल कॉलेज, एमआयएमएस लातूर, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज, बीकेएल वाळवळकर ग्रामीण मेडिकल कॉलेज आणि एसएसपीएम मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे.
खासगी वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्कात झालेल्या या बदलामुळे एमबीबीएस प्रवेशाच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसमोर आर्थिक नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः शैक्षणिक कर्जावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी वाढलेले वार्षिक शुल्क हा चिंतेचा विषय ठरणार आहे.
Editer sunil thorat



