कवडी-माळवाडीत भाडेकरू पडताळणीचा मुद्दा ऐरणीवर ; ग्रामस्थांची पोलिसांकडे कारवाईची मागणी…कदमवाकवस्ती.

कदमवाकवस्ती (ता. हवेली ) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडी-माळवाडी परिसराची लोकसंख्या सुमारे १५ हजारांच्या आसपास असून, त्यापैकी अंदाजे ५ हजार नागरिक मूळ रहिवासी आहेत. उर्वरित मोठ्या प्रमाणातील नागरिक विविध कारणांसाठी या परिसरात भाड्याने वास्तव्यास असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पुणे शहराला लागून असलेल्या या परिसरात रोजगार व व्यवसायाच्या निमित्ताने शहर आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या कुटुंबांना तातडीने भाड्याने घरे व खोल्या उपलब्ध होत असल्याने गेल्या काही वर्षांत भाडेकरूंची संख्या वाढली आहे.
मात्र, काही घरमालकांकडून भाडेकरूंना घरात ठेवताना आवश्यक भाडेकरार तसेच पोलिसांकडे भाडेकरूंची माहिती देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिसरात नेमके कोण वास्तव्यास आहे, याची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कवडी-माळवाडी, कवडीपाट, गुजरवस्ती, भापकर प्लॉटिंग, स्टार सिटी आणि गणराज पार्क या परिसरातील भाड्याने दिलेल्या घरांची व तेथे वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंची पोलिसांकडून विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तपासणीदरम्यान नियमांचे पालन न करणारे घरमालक आढळल्यास संबंधितांवर लागू असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. विशेषतः भाडेकरूंची ओळख, पत्ता आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून त्याची नोंद पोलिसांकडे आहे का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“कवडी-माळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भाडेकरू वास्तव्यास आहेत. त्यातील प्रत्येकाची योग्य ओळख व पडताळणी होणे गरजेचे आहे. पोलिसांनी घरमालकांकडून भाडेकरूंची माहिती घेऊन प्रत्यक्ष तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली. दरम्यान, वाढती लोकसंख्या आणि भाडेकरूंची संख्या लक्षात घेता लोणी काळभोर पोलिसांनी या परिसरात विशेष भाडेकरू पडताळणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होईल, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
“भाडेकरूंची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे” – हभप सुशील महाराज काळभोर याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, “कवडीपाट परिसरात भाडेकरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. घर भाड्याने देताना त्यांची पार्श्वभूमी पाहिली जात नाही. तो कुठून आला आहे, त्याची ओळख कोणाशी आहे, याबाबत अनेकदा काहीच पाहिले जात नाही आणि थेट घर भाड्याने दिले जाते.”
“त्यामुळे येणाऱ्या काळात परिसरातील नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू नये, यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. या संदर्भात लोणी काळभोर पोलीस स्टेशनला विनंती आहे की, आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत. भाडेकरूंची योग्य पडताळणी झाल्यास परिसरातील नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होईल,”
विशाल गुजर यांची प्रतिक्रिया “कवडी माळवाडी परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, प्रशासनाच्या वतीने घरमालकांना आवाहन करण्यात येत आहे की, घर भाड्याने देताना भाडेकरूची संपूर्ण पार्श्वभूमी व ओळख तपासूनच घर भाड्याने द्यावे. भाडेकरूंसोबत नियमानुसार अॅग्रीमेंट करून त्याची आवश्यक माहिती प्रशासन व स्थानिक पोलिसांना द्यावी. प्रशासनाच्या या आवाहनाला घरमालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करावे.
भाडेकरूंची योग्य पडताळणी आणि नोंद ठेवल्यास परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घरमालक, नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करून कवडी माळवाडी परिसर भयमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
Editer sunil thorat



