कवडीपाट टोलनाक्याजवळील धोकादायक ‘मिडियन ओपनिंग’ वर प्रशासनाची चाचपणी ; तात्पुरती कार्यवाही सुरू…
५ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची हालचाल; १० ते १५ दिवस वाहतुकीचा अभ्यास करून कायमस्वरूपी निर्णय होणार...
कवडीपाट (कदमवाकवस्ती) : पुणे–सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका परिसरातील धोकादायक मिडियन ओपनिंगबाबत अखेर प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे. ५ सप्टेंबर रोजी कवडीपाट ग्रामस्थ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उपोषण व रास्ता रोको आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही हाती घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता वर्षा जगताप यांनी लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जोरे यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कवडीपाट परिसरातील दोन मिडियन ओपनिंगपैकी फातिमानगर येथील एक ओपनिंग तात्पुरत्या स्वरूपात लहान करून वाहतुकीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील १० ते १५ दिवस वाहतुकीची स्थिती, वाहनांची हालचाल आणि सुरक्षिततेचा आढावा घेऊन कायमस्वरूपी निर्णय घेतला जाणार आहे.
कवडी, माळवाडी तसेच परिसरातील लोकसंख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि वाहनचालकांची पुणे–सोलापूर महामार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र, कवडीपाट टोलनाका परिसरातील मिडियन ओपनिंगमधून वाहनांना वळण घेताना किंवा महामार्ग ओलांडताना वारंवार अपघात होत असल्याने हे ओपनिंग मध्ये बदल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती.
या प्रश्नावर अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, ठोस निर्णय होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते हभप सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, अँड. राहुल झेंडे, नितीन टिळेकर, महेश खुळपे, अतुल खामकर, जयवंत शिंदे, अजय सावंत, युवराज गुजर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राहुल जोगदंड आणि क्रांतीवीर लहुजी शक्ती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राकेश लोंढे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी केली होती.
मिडियन ओपनिंग बंद करण्याबाबत निर्णय न झाल्यास ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कवडीपाट टोलनाका येथे उपोषण, रास्ता रोको आणि निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन तात्पुरती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी आहेर यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.
या अनुषंगाने आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर ३/९/२०२६ रोजी प्रशासनाकडून तातडीने हालचाली सुरू करून दोन्ही बाजुला स्लमर टाकण्याचे काम सुरु करण्यात आले असून प्रशासनाकडुन इतर उपाय योजनेसाठी १५ दिवसांचा अवधी घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सांगितले.
प्रशासनाच्या पत्रानुसार, संबंधित मिडियन ओपनिंगमध्ये तात्पुरते बदल करून वाहतुकीचा अभ्यास केला जाणार आहे. साधारण १० ते १५ दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ते कायमस्वरूपी बंद करायचे की सुरक्षित अंतरावर पर्यायी यू-टर्नची व्यवस्था करायची, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याने प्रस्तावित आंदोलन तात्पुरते स्थगित करून प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. मात्र, या उपाययोजनांमुळे अपघातांना कितपत आळा बसेल, सिग्नल व्यवस्था उभारली जाणार का, दोन मिडियन ओपनिंगपैकी एक पूर्णपणे बंद होणार की त्यामध्ये बदल होणार, तसेच सुरक्षित अंतरावर पर्यायी यू-टर्नची व्यवस्था केली जाणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने सुरू केलेल्या या कार्यवाहीचा अंतिम निर्णय काय होतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
Editer sunil thorat



