देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार…

लोणी काळभोर (ता.हवेली) : देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करून परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर लोणी काळभोर पोलिसांनी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करत त्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. अक्षय वामन जाधव (वय २५, रा. नांदे पाटील वस्ती, सिद्राम मळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी ही कारवाई केली. अक्षय जाधव याच्याविरुद्ध देशी-विदेशी दारूची अवैध विक्री तसेच इतर अवैध कृत्यांबाबत यापूर्वी एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने तसेच त्याच्या अवैध व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांवर विपरीत परिणाम होऊन दारूच्या व्यसनामुळे कुटुंबांमध्ये सामाजिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली.
अक्षय जाधव याला पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.
देशी-विदेशी दारूची अवैध विक्री, साठवणूक अथवा वाहतूक करणाऱ्या तसेच अशा अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, सहायक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे तसेच पोलीस अंमलदार विलास शिंदे, प्रशांत नरसाळे, स्वाती पिसाळ, वैजीनाथ शेलार, अमोल जाधव, गणेश शिंदे, आणा माने, सागर जगदाळे, निलेश कोल्हे, सुरज कुंभार, प्रविण दडस, राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, सागर धायतोंडे, अशोक गिरी आणि अशोक खरात यांनी केली.
Editer sunil thorat



