बनावट नोटांचे रॅकेट उघड! विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ आरोपी जेरबंद
५ लाख ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त; नोटा छापण्यासाठी वापरलेला कलर प्रिंटरसह २१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ५०० रुपये दराच्या एकूण १ हजार १२८ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटांची दर्शनी किंमत ५ लाख ६४ हजार रुपये आहे. याशिवाय बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कलर प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू, की-बोर्ड, माऊस यांसह अन्य साहित्य असा एकूण २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
महात्मा फुले मंडई परिसरात पहिला आरोपी जाळ्यात
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना एक संशयित व्यक्ती बनावट नोटा घेऊन महात्मा फुले मंडई परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी संबंधित पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडईच्या पाठीमागील बाजूस असलेल्या म्हसोबा मंदिरासमोरील अंतर्गत रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी सलमान जैनद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५०० रुपये दराच्या ८०५ बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांची दर्शनी किंमत ४ लाख २ हजार ५०० रुपये होती.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १८०, १७८, १७९, १८१ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासातून आणखी तीन साथीदारांचा पर्दाफाश…
अटक केलेल्या सलमान राजे याच्याकडे चौकशी केली असता, या प्रकरणात आणखी तीन साथीदार सहभागी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ कृषिकेश रावले यांच्या पूर्वपरवानगीने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत रवाना करण्यात आले.
या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शाफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. सुरुपखनवाडी, ता. माण, जि. सातारा) आणि अभिजीत रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना शिरोळ पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे अटक करण्यात आली.
नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त…
पोलिसांनी आरोपींकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. यामध्ये ईप्सन कंपनीचा प्रिंटर, एचपी कंपनीचा मॉनिटर, लेनोवो कंपनीचा वायरलेस की-बोर्ड व माऊस, झेब्रॉनिक कंपनीचा सीपीयू तसेच आर्टिस कंपनीचे साहित्य आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. या साहित्याची एकूण किंमत २१ हजार १०० रुपये आहे.
तसेच आरोपी शाफाज फिरोज अन्सारी याच्या राहत्या घरातून ५०० रुपये दराच्या आणखी ३२३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटांची दर्शनी किंमत १ लाख ६१ हजार ५०० रुपये आहे. पहिल्या आरोपीकडून मिळालेल्या ८०५ नोटा आणि घरातून जप्त केलेल्या ३२३ नोटा अशा एकूण १ हजार १२८ बनावट नोटा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यांची एकत्रित दर्शनी किंमत ५ लाख ६४ हजार रुपये आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) रमेश लाहिगुडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, शैलेश सुर्वे, समीर पवार, शशिकांत दरेकर, जाकीर मणियार, नितीन मुंढे, महेश कदम, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात आणि नितीन बाबर यांनी सहभाग घेतला.
बनावट चलनी नोटा तयार करून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नाचा पर्दाफाश झाल्याने या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासातून बनावट नोटांच्या निर्मिती आणि वितरणाबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
— विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे
Editer sunil thorat





