बेकायदेशीर मटका जुगाराचा धंदा भोवला! लोणी काळभोरमधील दोन सराईत आरोपी दोन वर्षांसाठी हद्दपार…
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निर्देशानुसार कारवाई; वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या प्रस्तावाला यश...

लोणी काळभोर (ता. हवेली) : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. परिसरात सातत्याने बेकायदेशीर मटका जुगाराचा व्यवसाय करणाऱ्या दोन सराईत आरोपींना दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६ यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रोहन संतोष शुक्ला (वय ३०, रा. आग्रेवस्ती, लोणी काळभोर) आणि सागर भगवान ऊर्फाडे (वय ३१, रा. पाषाणकर बागेजवळ, लोणी काळभोर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे शहरातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायम राहावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा, यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगारांवर कठोर व परिणामकारक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार टोळीने गुन्हे करणारे, बेकायदेशीर मटका जुगार चालविणारे, अंमली पदार्थांची विक्री करणारे तसेच दरोडा, जबरी चोरी आणि शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोहन शुक्ला आणि सागर ऊर्फाडे हे दोघेही पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपी असून, प्रतिबंधात्मक कारवाई करूनही ते कथितरीत्या सातत्याने बेकायदेशीर मटका जुगाराचा व्यवसाय करत होते. त्यांच्या कृत्यांमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून, सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या दोघांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाची दखल घेत संबंधित प्राधिकाऱ्यांनी रोहन संतोष शुक्ला आणि सागर भगवान ऊर्फाडे यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.
बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या तसेच बेकायदेशीर व्यवसायांतून नागरिकांना त्रास देणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील बेकायदेशीर मटका जुगाराच्या व्यवसायाला आळा घालण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, पोलीस हवालदार विलास शिंदे, महिला पोलीस हवालदार स्वाती पिसाळ, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे आणि पोलीस अंमलदार प्रवीण दडस यांनी सहभाग घेतला.
Editer sunil thorat





