चारित्र्य पडताळणीसाठी बनावट भाडेकराराचा खेळ! मोबाईलवर PDF एडिट करून शासनाची दिशाभूल ; लोणी काळभोरमध्ये गुन्हा दाखल…
मोबाईलवरून मूळ PDF मध्ये फेरफार करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप ; गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कोळी यांच्याकडे तपास...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मूळ भाडेकराराच्या PDF मध्ये मोबाईलवरून फेरफार करून बनावट भाडेकरार तयार केल्याचा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चेतन मार्कस पवार (वय ३८, रा. यश हाईट्स, फ्लॅट क्रमांक ४०३, त्रिवेणीनगर, भेकराईनगर, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार वैशाली नागवडे यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(१), ३३६(३), ३३९ आणि ३४० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जातील पत्त्यामुळे पोलिसांना संशय…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेश श्रीहरी केदार हा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आला होता. चारित्र्य पडताळणी विभागात त्याच्या कागदपत्रांची तपासणी करताना महिला पोलीस हवालदार वैशाली नागवडे यांना त्याच्या राहत्या पत्त्याबाबत संशय निर्माण झाला. अर्जात कवडीपाट येथील पत्ता नमूद असताना उमेश केदार याने आपण भेकराईनगर येथे राहत असल्याचे सांगितले. त्याच्याकडे मूळ कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे केवळ छायांकित प्रती असल्याचे समोर आले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, उमेश केदार याने आपला घरमालक चेतन पवार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आणि कथित बनावट भाडेकराराचा प्रकार उघडकीस आला.
मूळ भाडेकरारातील माहितीमध्ये फेरफार…
पोलिसांच्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील माळवाडी-कवडीपाट परिसरातील लक्ष्मीनारायण कृपा, गट क्रमांक १०२८ येथील घरमालक नारायण टिकाराम पवार आणि मूळ भाडेकरू संदेश सोनकांबळे यांच्या नावाने असलेल्या भाडेकराराच्या PDF मध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप आहे. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेश श्रीहरी केदार याच्या नावाने बनावट भाडेकरार तयार करून तो पोलिसांसमोर सादर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
घरमालकाच्या चौकशीत प्रकार उघड…
पोलिसांनी संबंधित घरमालक नारायण पवार यांच्याकडे चौकशी केली असता, उमेश केदार हा आपला भाडेकरू नसून संदेश सोनकांबळे हाच संबंधित घराचा भाडेकरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर चेतन पवार याच्याकडे चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने मोबाईलद्वारे ऑनलाइन लिंकचा वापर करून मूळ भाडेकराराच्या PDF मध्ये एडिटिंग केल्याचे तपासात समोर आले. या माध्यमातून बनावट करार तयार करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी करीत आहेत. ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक नंदकुमार कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे, महिला पोलीस हवालदार वैशाली नागवडे तसेच पोलीस अंमलदार अण्णा माने, अमोल जाधव, गणेश शिंदे, सागर जगदाळे, निलेश कोल्हे, सुरज कुंभार, प्रविण दडस, राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, सागर धायतोंडे, अशोक गिरी आणि अशोक खरात यांनी सहभाग घेतला.
चारित्र्य पडताळणीसारख्या शासकीय प्रक्रियेत सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची सत्यता तपासण्याचे महत्त्व या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.
Editer sunil thora






