विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे; मोबाईल, जंक फूड अन् व्हेप पेनच्या वाढत्या धोक्याबाबत तज्ज्ञांचा गंभीर इशारा!
माजी विद्यार्थी महासंघाच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा व गुणगौरव सोहळा उत्साहात; संचिता काळोखे हिची चारही परीक्षांत १०० पैकी १०० गुणांची ऐतिहासिक कामगिरी

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या २० विद्यानिकेतन शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघाच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात व्यसनमुक्ती या विषयावर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगत व्यसनमुक्त जीवनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
जंक फूड, मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसनही धोकादायक!
कार्यक्रमाला होप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल देवळेकर आणि आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अजय दुधाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. अमोल देवळेकर यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या व्यसनांच्या नव्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. दारू, तंबाखू यांसारख्या पारंपरिक व्यसनांसोबतच व्हेप पेन, ई-सिगारेट, मोबाईल, इन्स्टाग्राम आणि कॉम्प्युटर गेम्स यांचे आकर्षण मुलांमध्ये वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मॅगी, चिप्स, कुरकुरे आणि पॅक्ड फूड यांसारख्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मोबाईल आणि सोशल मीडिया व्यसनाचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक!
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अजय दुधाणे यांनी गेल्या २५ वर्षांतील व्यसनमुक्ती क्षेत्रातील अनुभव मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रात येणाऱ्या रुग्णांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाच्या व्यसनाशी संबंधित रुग्णांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. शाळकरी मुलांच्या दप्तरांमध्ये ई-सिगारेट आणि व्हेप पेन आढळण्याच्या घटनांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रत्येक शाळेत पालक आणि शिक्षकांसाठी विशेष प्रबोधन सत्रे आयोजित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ
चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक शाळेतील छोट्या व मोठ्या गटांमधील प्रत्येकी दहा उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. व्यसनमुक्तीचा संदेश चित्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
संचिता काळोखेची चारही परीक्षांत शंभर टक्के गुणांची कामगिरी
कार्यक्रमात ‘जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्स बॅच ३‘ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही ट्रॉफी व मेडल देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये संचिता काळोखे हिने चारही परीक्षा प्रकारांत १०० पैकी १०० गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. भूमी म्हस्के, स्पृहा भारांबे, राजीव कनोजिया, देविका लिपणे आणि कार्तिक पाठारे यांनीही घवघवीत यश मिळविले. तसेच ज्येष्ठ विद्यार्थ्यांमधून मनीषा दोरगे आणि उज्वला कामत यांची ‘आऊटस्टँडिंग परफॉर्मर‘ म्हणून विशेष निवड करण्यात आली.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांचे विशेष सहकार्य
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे प्रमुख कार्यवाहक समीर दरेकर यांनी केले. सर्व विद्यानिकेतन शाळांच्या वतीने जयवंत बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रप्रदर्शनाचे नियोजन व मांडणी फारुख तांबोळी आणि हर्षद छल्लारे यांनी केली. संतोष जाधव व उमेश इंदापूरकर यांनी सहकार्य केले. कल्पना मोरे, मोईना इनामदार आणि नियाथ बनसोडे यांनी सूत्रसंचालन व बक्षीस वितरणाची जबाबदारी सांभाळली.
यावेळी मुख्याध्यापिका वीणा नाईक, ज्येष्ठ शिक्षक विष्णू सुर्वे यांच्यासह विविध विद्यानिकेतन शाळांचे चित्रकला शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरला.
Editer sunil thorat







