मोक्कातील फरार सराईत गुन्हेगार तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या जाळ्यात!
स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची फुरसुंगी परिसरात कारवाई ; अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खंडणी प्रकरणात होता फरार...

राजगड (पुणे) : राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खंडणीच्या गंभीर गुन्ह्यातील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई झालेला फरार सराईत आरोपी तुषार नामदेव हंबीर (वय ४०, रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर, पुणे) याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी फुरसुंगी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. अटकेपासून बचाव करण्यासाठी वारंवार राहण्याची ठिकाणे आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल सिमकार्ड बदलणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७/२०२६ अन्वये हा गुन्हा दाखल आहे. कापूरहोळ ते नारायणपूर रोडवर गुरुकृपा मेडिकलसमोर फिर्यादी यांचा मुलगा पृथ्वीराज हा अँक्टिव्हा दुचाकीवरून घरी जात असताना एमएच १२ एक्सई ५३५३ क्रमांकाच्या कारमधील आरोपींनी त्याची दुचाकी अडवली. त्यानंतर त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून अपहरण केले. यावेळी आरोपींनी, “तुम्ही आमच्यावर केसेस करणार, मग आम्ही तुम्हाला सोडणार का?” अशी धमकी दिली. तसेच पिस्तुलाची नळी तोंडात टाकून जीवे मारण्याची धमकी देत त्याला घेऊन जात असताना पोलिसांच्या कारवाईत काही आरोपी हाती लागले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची बैठक घेऊन फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. फरार आरोपी हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून २९ ऑक्टोबर रोजी फुरसुंगी परिसरातून तुषार हंबीर याला ताब्यात घेतले.
तुषार हंबीर याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, गर्दी व मारामारी तसेच आर्म अँक्ट यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा, आर्म अँक्ट आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, पोलीस अंमलदार रामदास बाबर, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे, तुषार भोईटे, चेतन पाटील आणि भारत मोहळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर करीत आहेत.
Editer sunil thorat






