जेएसपीएमच्या जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये पालक-शिक्षक बैठक उत्साहात संपन्न!
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासावर भर; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

हडपसर : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे तसेच पालक आणि महाविद्यालय यांच्यात समन्वय व सुसंवाद वाढविण्याच्या उद्देशाने जेएसपीएमच्या जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (JSIP) येथे शनिवार (दि. ३१ ऑक्टोबर २०२६) रोजी पालक-शिक्षक बैठकीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या बैठकीला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी उपस्थित पालकांचे स्वागत करून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. फार्मसी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविध संधींचा विचार करता विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्य विकास, प्रात्यक्षिक ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालयाकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅम्पस प्रमुख डॉ. मारुती काळबांडे उपस्थित होते. तसेच पालक प्रतिनिधी सारिका राऊत, राजन बनसोडे, सुधीर कासार, नागोराव कदम आणि दत्तात्रय गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीदरम्यान प्राध्यापकांनी पालकांना नवीन अभ्यासक्रम, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा आणि गुणदान पद्धतीची सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या ‘जीएफएम’ (GFM) योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या उपस्थितीवर, शैक्षणिक प्रगतीवर आणि वैयक्तिक अडचणींवर कशा प्रकारे लक्ष ठेवले जाते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नामांकित फार्मास्युटिकल कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी, प्लेसमेंट आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाविद्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
या बैठकीत पालकांनी शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. महाविद्यालयातील शैक्षणिक शिस्त, प्रयोगशाळेतील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे पालकांनी कौतुक केले. तसेच महाविद्यालयाच्या भविष्यातील प्रगतीसाठी विविध सूचना व अभिप्रायही नोंदविले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाविद्यालयात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे आणि डॉ. मारुती काळबांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. निकिता कोलते यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अनुराधा पाटील यांनी केले. तसेच डॉ. रविराज जाधव, डॉ. अजय साळुंके, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन मामडगे, प्रा. शितल हुमनाबादे, स्वप्नाली सावंत, ऋतुजा दाते, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, पांडुरंग पवार, वर्षा सुतार आणि आरती धुमाळे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित पालकांचे आभार मानून बैठकीचा समारोप करण्यात आला.
Editer sunil thorat








