आंबेगाव तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांचा आढावा; पाणीटंचाई, चारा उपलब्धता अन् पीक नुकसानीच्या पंचनाम्यांवर प्रशासनाचा भर!
दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत मिळावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे यांचे निर्देश

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा उपलब्धता, शेतपिकांचे नुकसान आणि पीक पंचनाम्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी घोडेगाव येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली. दुष्काळग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व आवश्यक मदत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या १४ ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांच्यासह महावितरण, वन विभाग, कृषी विभाग, लघुपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे तसेच वाड्या-वस्त्यांमधील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलस्रोतांची सद्यस्थिती आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवेल, तेथे आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी चारा साठ्याची स्थिती तपासून संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या निर्धारित निकषांनुसार अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या. पंचनाम्यांचे अहवाल वेळेत सादर करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार आर्थिक मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, दुष्काळाच्या परिस्थितीत नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहावे. पाणीपुरवठा, चारा उपलब्धता, पीक नुकसान आणि नागरिकांच्या तक्रारी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजनांचे नियोजन सुरू झाले असून, प्रत्यक्षात या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन शेतकरी आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat






