PMPMLच्या तिकिटावर गावांची नावे गायब; अनिल शिंदेंचा संताप, “व्यावसायिक ठिकाणांची नावे नको, गावांचीच नावे द्या!”
हडपसर–वरवंड बससेवेतील तिकीट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, सोरतापवाडी, कुंजीरवाडीची नावे तिकिटावर देण्याची मागणी

कदमवाकवस्ती (वा) : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) हडपसर–वरवंड आणि वरवंड–हडपसर बससेवेतील तिकीट व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलांवरून प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष गावांची नावे वगळून काही ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालय किंवा कारखान्यांची नावे तिकिटावर देण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेना विभाग प्रमुख तथा अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना अनिल दशरथ शिंदे यांनी PMPML प्रशासनाकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
हडपसर ते चौफुला, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, सोरतापवाडी, कुंजीरवाडीमार्गे वरवंडपर्यंतचा मार्ग हा हजारो प्रवाशांच्या दैनंदिन वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या मार्गावरील प्रमुख गावांची नावेच तिकीट व्यवस्थेतून बाजूला पडल्याने PMPML प्रशासन नेमके कोणाच्या सोयीसाठी तिकीट व्यवस्था राबवत आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
विशेषतः उरुळी कांचन ते लोणी काळभोर प्रवास करताना तिकिटावर ‘लोणी काळभोर’ऐवजी ‘रामा कृषी रसायन कारखाना’ असे नाव दिले जात असल्याचा आक्षेप आहे. त्याचप्रमाणे चौफुला ते लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील प्रवाशांना इच्छित ठिकाणी उतरायचे असतानाही तिकीट व्यवस्थेतील नावांमुळे पुढील थांब्याचे तिकीट घ्यावे लागत असल्याची तक्रार आहे.
गावांची ओळख पुसून कारखाने-हॉटेलांची नावे कशासाठी?
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, सोरतापवाडी आणि कुंजीरवाडी ही पुणे-सोलापूर महामार्गावरील मोठी आणि महत्त्वाची गावे आहेत. या गावांची स्वतंत्र ओळख असताना तिकिटावर गावांचे नाव न देता व्यावसायिक आस्थापनांची नावे देणे चुकीचे असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
“प्रवाशांना ज्या गावात उतरायचे आहे, त्या गावाचेच नाव तिकिटावर असले पाहिजे. तिकीट मशीनमध्ये गावांची नावे नसतील आणि त्याऐवजी कारखाने अथवा इतर आस्थापनांची नावे असतील, तर सामान्य प्रवाशांनी नेमके तिकीट कसे घ्यायचे?” असा सवाल अनिल शिंदे यांनी केला आहे.
नावबदलाचा आदेश दाखवा; तिकीट मशीनची तपासणी करा
संबंधित बसथांब्यांची नावे कोणत्या आदेशाने बदलण्यात आली? त्याला कोणाची मंजुरी आहे? जुने व नवीन नाव काय आहे? तिकीट मशीनमध्ये बदल करण्याचा निर्णय कोणी घेतला? याची संपूर्ण माहिती PMPML प्रशासनाने सार्वजनिक करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
प्रत्यक्ष बसथांबा आणि तिकिटावरील नाव यामध्ये विसंगती असल्यास ती तातडीने दूर करून ज्या गावात बसथांबा आहे, त्याच गावाचे स्पष्ट नाव तिकिटावर छापले जावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
अन्यथा ‘बस रोको’चा इशारा
प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन तिकीट व्यवस्थेत तातडीने सुधारणा न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा अनिल दशरथ शिंदे यांनी दिला आहे.
“प्रवाशांच्या मूलभूत सोयीशी संबंधित प्रश्नाकडे PMPML प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. गावांची नावे तिकिटावर देणे ही कोणतीही विशेष मागणी नसून प्रवाशांचा मूलभूत हक्क आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास PMPML बस रोको आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा शिवसेना विभाग प्रमुख तथा रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष अनिल दशरथ शिंदे यांनी दिला आहे.
Editer sunil thorat







