हडपसरकरांच्या पाण्याशी प्रशासनाचा खेळ किती दिवस?
पाणी हा हक्क, उपकार नाही! रखडलेल्या योजना तातडीने सुरू करा; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२६ : हडपसर परिसरातील गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत सुरसे आणि सौ. पल्लवी सुरसे यांनी पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. हडपसरकरांना नियमित, पुरेसा आणि समान पाणीपुरवठा मिळावा, यासाठी रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हडपसर गावठाण, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर, १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठल नगर, ससाणेनगर आणि काळे-बोराटे नगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करत आहेत. पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन अनेक वर्षे उलटूनही नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
पूर्ण झालेल्या योजना असूनही पाणीपुरवठा रखडला
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काळे-बोराटे नगर येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातील ३५ लाख लिटर क्षमतेचा जलसाठा प्रकल्प तसेच हडपसर बस डेपो येथील ४५ लाख लिटर क्षमतेचा जलसाठा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, या योजनांमधून अद्याप प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
या प्रश्नावर दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी निवेदन आणि दि. १६ मार्च २०२६ रोजी स्मरणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर दि. ३० मार्च २०२६ पासून पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप प्रभावी कार्यवाही न झाल्याचा आरोप सुरसे यांनी केला.
तुकाई टेकडीवरील बुस्टर पंप सुरू करण्याची मागणी
तुकाई टेकडी येथील पाणीपुरवठा योजना सध्या ग्रॅव्हिटी पद्धतीने सुरू असल्याने सातववाडी, गोंधळेनगर, महात्मा फुले वसाहत, गाडीतळ, उन्नतीनगर, काळे-बोराटे नगर यासह विविध भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे तुकाई टेकडी पाणीपुरवठा योजना विद्युत (बुस्टर) पंपाद्वारे तातडीने सुरू करून कमी दाबाची समस्या दूर करावी, अशी ठाम मागणी प्रशांत सुरसे व पल्लवी सुरसे यांनी केली.
तसेच हडपसर बस डेपो येथील पाणीपुरवठा योजनेतून १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी आणि विठ्ठल नगर परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक तांत्रिक नियोजन करून ठोस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
दूषित पाण्याच्या तक्रारींची चौकशी करा
हडपसर परिसरातील काही भागांत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे दूषित पाणी मिसळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या तक्रारींची तातडीने तपासणी करून दोषी आढळणाऱ्या यंत्रणा किंवा संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाईबाबत संबंधित Jain Irrigation Systems Limited या ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी. दोष आढळल्यास ब्लॅकलिस्टसह कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
प्रशासनाला थेट सवाल
पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी आणखी किती वेळ लागणार?
३० मार्च २०२६ रोजी दिलेले लेखी आश्वासन अद्याप का पाळले गेले नाही?
तुकाई टेकडीवरील बुस्टर पंप कधी सुरू होणार?
दूषित पाण्याच्या तक्रारींवर कारवाई का होत नाही?
योजनेतील दिरंगाईसाठी जबाबदार ठेकेदारांवर कारवाई कधी होणार?
“हडपसरकरांना आता आश्वासन नको, प्रत्यक्ष पाणी हवे आहे. पूर्ण झालेल्या योजना केवळ कागदावर ठेवून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे सहन केले जाणार नाही,” असा इशारा प्रशांत सुरसे यांनी दिला.
ऑगस्टअखेरपर्यंत कार्यवाही करा; अन्यथा जनआंदोलन
पुणे महानगरपालिका प्रशासनाने हडपसरच्या पाणीप्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करून परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी. निवेदनातील मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही करून पाणीपुरवठा योजना कोणत्या तारखेपासून सुरू होणार, तुकाई टेकडीवरील बुस्टर पंपाबाबत काय निर्णय घेतला आणि १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी व विठ्ठल नगर परिसरासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत ठोस कार्यवाही झाली नाही किंवा लेखी उत्तर देण्यात आले नाही, तर हडपसरमधील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा प्रशांत सुरसे व सौ. पल्लवी सुरसे यांनी दिला.
यावेळी प्रशांत सुरसे, सौ. पल्लवी सुरसे, नंदकुमार अजोतीकर, बापूसाहेब पोटे, गणेश जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Editor sunil thorat



