कवडीपाट टोलनाक्यावरील प्रकाराने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादी हवेली तालुका कार्याध्यक्ष युवराज काळभोर यांची तातडीने कारवाईची मागणी
पालखी गेली, कमानी राहिल्या; विठ्ठल-रुक्माईच्या मूर्ती धूळ-मातीत!

कवडीपाट, ता. हवेली, जि. पुणे : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शासन आणि प्रशासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नियोजन केले जाते. देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंतच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सोयीसुविधा, सुरक्षा, स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रशासनाकडून मोठी लगबग केली जाते.
यंदाच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी हवेली तालुक्यातील कवडीपाट टोलनाका परिसरात आकर्षक कमान उभारण्यात आली होती. या कमानीवर विठ्ठल-रुक्माईच्या मूर्ती बसविण्यात आल्या होत्या. तसेच कमानीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे लावण्यात आली होती.
मात्र पालखी सोहळा पंढरपूरला जाऊन पुन्हा देहू-आळंदीच्या दिशेने परतल्यानंतरही कवडीपाट टोलनाका येथील कमान मात्र तशीच उभी असल्याचे दिसून येत आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे कमानीवरील विठ्ठल-रुक्माईच्या मूर्तींची योग्य देखभाल होत नसल्याने त्यांच्यावर पावसाचे पाणी, धूळ, चिखल आणि माती साचत असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कवडीपाट टोलनाका परिसरातून दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ आणि चिखल उडत असल्याने त्याचा परिणाम थेट मूर्तींवर होत आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या विठ्ठल-रुक्माईच्या मूर्ती अस्वच्छ अवस्थेत राहणे ही प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पालखी प्रस्थानाच्या आधी कमानी उभारण्यासाठी प्रशासनाची लगबग झाली. मात्र पालखी सोहळा संपल्यानंतर त्याच कमानीवरील धार्मिक मूर्तींची स्वच्छता, देखभाल किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विठ्ठल-रुक्माईच्या मूर्ती केवळ सजावटीचा भाग नाहीत, तर त्या वारकरी संप्रदायाच्या आणि महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांची धूळ-मातीमध्ये होणारी अवस्था तातडीने थांबविणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे युवराज काळभोर आक्रमक…
या प्रकाराची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका कार्याध्यक्ष युवराज काळभोर यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“पालखी प्रस्थानाच्या वेळी कमान उभारण्यासाठी प्रशासनाने ज्या पद्धतीने तत्परता दाखवली, त्याच तत्परतेने आता कमानीवरील विठ्ठल-रुक्माईच्या मूर्तींची स्वच्छता आणि सुरक्षिततेची व्यवस्था करावी. मूर्तींची नियमित देखभाल करणे शक्य नसेल, तर त्या तातडीने तेथून सन्मानपूर्वक हटवून सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात,” अशी मागणी युवराज काळभोर यांनी केली आहे.
श्रद्धेच्या प्रतीकांकडे दुर्लक्ष का?
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून आकर्षक कमानी, स्वागत व्यवस्था आणि सुशोभीकरण केले जाते. मात्र सोहळा संपल्यानंतर या व्यवस्थेची जबाबदारी निश्चित नसेल, तर त्यातून अशा समस्या निर्माण होतात.
पालखी गेली, वारकरी पुढे गेले; पण विठ्ठल-रुक्माईच्या मूर्ती मात्र धूळ-मातीमध्येच राहिल्या, तर हा प्रशासनाच्या नियोजनाचा विरोधाभास नाही का? असा थेट सवाल युवराज काळभोर यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने तातडीने कवडीपाट टोलनाका येथील कमानीची पाहणी करून मूर्तींची स्वच्छता करावी. तसेच कमान कायम ठेवण्याची गरज नसेल तर ती हटवून विठ्ठल-रुक्माईच्या मूर्ती सुरक्षित आणि सन्मानपूर्वक ठिकाणी हलवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘पालखी सोहळ्यापुरती श्रद्धा नको; कायमचा सन्मान हवा’
पालखी सोहळा हा केवळ काही दिवसांचा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या धार्मिक प्रतीकांची प्रतिष्ठा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी.
कमान उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा त्या कमानीवरील विठ्ठल-रुक्माईच्या मूर्तींच्या सन्मानाची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांच्या भावनांचा आदर करावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी हवेली तालुका कार्याध्यक्ष युवराज काळभोर यांनी केली आहे.
आता प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि कवडीपाट टोलनाका येथील विठ्ठल-रुक्माईच्या मूर्तींबाबत तातडीने काय निर्णय घेते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



