दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत हवेलीचा समावेश करण्यासाठी सभापती युवराज काकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हवेलीच्या दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार; ‘जलतारा’ प्रकल्पाला पुढील आठवड्यापासून सुरुवात!

हवेली : हवेली तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पंचायत समिती हवेलीच्या वतीने विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, जलसंधारण, मृदसंधारण, पाणी पुनर्भरण आणि चारा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार आहे. पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी आयोजित दुष्काळ निवारण नियोजन बैठकीत विविध विभागांच्या माध्यमातून करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले. या कामांसाठी नाम फाउंडेशन आणि बायफ संस्थांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, बैठक संपल्यानंतर हवेली तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आले.
बैठकीत अस्तित्वातील बंधाऱ्यांचे खोलीकरण, नवीन बंधाऱ्यांची उभारणी, ओढे-नाल्यांचे खोलीकरण व अस्तरीकरण, वनराई बंधारे, विहीर आणि बोअरवेल पुनर्भरण अशा विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले. कृषी विभागाने जलसंधारण व मृदसंधारण योजनांची माहिती दिली. तालुक्यातील प्रत्येक गावात शाळा, महाविद्यालये आणि तरुण मंडळांच्या सहभागातून वनराई बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था उभारण्यावरही भर देण्यात येणार आहे.
पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, मृदसंधारण आणि चारा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयांमध्ये तालुकास्तरीय निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना सभापती व गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीची प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देण्यात येणार आहेत.
चारा व्यवस्थापनाच्या दृष्टीने सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. बायफ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार आवारे यांनी संस्थेच्या संशोधन कार्याची माहिती देत चारा व्यवस्थापन व पशुधन संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. नाम फाउंडेशनचे मल्हार नानासाहेब पाटेकर यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी जेसीबी यंत्र नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. आदर पूनावाला क्लीन सिटीचे व्यवस्थापक मल्हार करवंदे यांनी शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत माहिती देत विविध उपक्रमांत सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले.
दरम्यान, जमिनीतील नैसर्गिक पाणी पुनर्भरण वाढविण्याच्या उद्देशाने पंचायत समिती हवेली, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने ‘जलतारा’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सभापती युवराज काकडे यांनी दिली. या प्रकल्पाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या बैठकीस उपसभापती विद्या गायकवाड, गटविकास अधिकारी शेखर शेलार, नाम फाउंडेशनचे मल्हार नानासाहेब पाटेकर, आदर पूनावाला क्लीन सिटीचे व्यवस्थापक मल्हार करवंदे, बायफ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार आवारे, जिल्हा परिषद सदस्य रूपाली रमेश कोंडे, किरण साकोरे, पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी, मनोज चौधरी, युवराज वांजळे, सुषमा मुरकुटे, राणी वाळके, मोनिका कंद, शुभांगी खिरीड, कोमल गणेश कांबळे, अमोल टेकाळे यांच्यासह कृषी, लघुपाटबंधारे, बांधकाम, पशुसंवर्धन आणि नरेगा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हवेलीच्या दुष्काळी समावेशासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दुष्काळ निवारण नियोजन बैठक संपल्यानंतर सभापती युवराज काकडे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. हवेली तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाईची शक्यता आणि शेतकरी व पशुधनासमोरील प्रश्न लक्षात घेता हवेली तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आता या मागणीवर जिल्हा प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि तालुक्यातील प्रस्तावित उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे हवेली तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat








