जिल्हाशिक्षणसामाजिक

मांजरीत चिमुकल्याच्या कथित अपहरणाच्या अफवेने घेतला रौद्ररूप; गैरसमजातून युवकाला बेदम मारहाण, पोलिसांच्या चौकशीनंतर निर्दोष सुटका…

मांजरी, (ता. हवेली) : मांजरी येथील एसएनबीपी शाळेजवळ मंगळवार (दि. २१ जुलै) रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका घटनेने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. एका चिमुकल्याच्या कथित अपहरणाचा प्रयत्न झाल्याची अफवा परिसरात वेगाने पसरली. मात्र, मांजरी पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर हा प्रकार केवळ गैरसमजातून घडल्याचे समोर आले. कोणताही अपहरणाचा हेतू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संदीप विश्वकर्मा यांची कोणतीही गुन्हा नोंद न करता सुटका करण्यात आली. मात्र, अफवेमुळे जमावाकडून झालेल्या मारहाणीने विश्वकर्मा कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप विश्वकर्मा हे आपल्या मुलाला शाळेत आणण्यासाठी एसएनबीपी शाळेजवळ गेले होते. त्यावेळी परिसरात उभ्या असलेल्या एका महिलेच्या हातातील लहान बाळ त्यांनी काही क्षणांसाठी उचलले. काही मिनिटांतच त्यांनी ते बाळ पुन्हा संबंधित महिलेच्या स्वाधीन केले. मात्र, हा प्रकार पाहणाऱ्या काही नागरिकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढत “मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न” झाल्याची आरडाओरड सुरू केली. काही क्षणांतच मोठा जमाव जमा झाला आणि कोणतीही खातरजमा न करता संदीप विश्वकर्मा यांना बेदम मारहाण करण्यात आली.

घटनेची माहिती आपत्कालीन सेवा क्रमांक ११२ वर देण्यात आली. त्यानंतर मांजरी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संदीप विश्वकर्मा यांना ताब्यात घेत त्यांचा मोबाईल आणि वाहन तपासणीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सविस्तर चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये संदीप विश्वकर्मा यांनी संबंधित मुलाला उचलल्याचे तसेच काही वेळातच त्या महिलेकडे सुरक्षितपणे परत दिल्याचे स्पष्टपणे दिसून आले. फुटेजमध्ये मुलाला घेऊन पळून जाण्याचा अथवा अपहरणाचा प्रयत्न केल्याचे कोणतेही दृश्य आढळून आले नसल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित महिलेचाही जबाब नोंदविला. त्यावेळी तिने, “संदीप विश्वकर्मा यांनी माझ्या मुलाला पळवून नेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यांनी कोणतीही संशयास्पद हालचाल केली नाही. माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही,” असे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती आहे.

याबाबत मांजरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, प्राथमिक चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांनुसार हा प्रकार गैरसमजातून घडल्याचे निदर्शनास आले. अपहरणाचा कोणताही हेतू अथवा गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आढळून न आल्याने संदीप विश्वकर्मा यांना कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे ही जबाबदारी असली, तरी कोणतीही खातरजमा न करता कायदा हातात घेणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे उदाहरण मानले जात आहे. अफवा, गैरसमज आणि जमावाचा आक्रमकपणा यामुळे एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे अशा प्रसंगी संयम बाळगून सत्य परिस्थिती समोर येईपर्यंत पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या चौकशीमुळे कथित अपहरणाची अफवा निराधार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष घटनास्थळी अपुऱ्या माहितीतून अफवा पसरविणे आणि जमावाला चिथावणी देणे टाळण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??